(बारामती)
आरक्षण प्रश्नावरून राज्यात तणाव निर्माण होण्याचे काही कारण नाही. असे प्रश्न सामंजस्याने सोडवायचे असतात. जात, धर्म काहीही असले तरी आपण भारतीय आहोत, महाराष्ट्राचे घटक आहोत. त्यामुळे नेतृत्व करणाऱ्यांनी या मागणीची पूर्तता कशी करता येईल, राज्यात चांगले वातावरण कसे राहील, याची खबरदारी घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त करीत एकप्रकारे याप्रश्नी आपले हात वर केले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम पुढील आठवड्यात राज्यात येत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, निवडणूक आयोगाच्या या दृष्टिकोनाचे स्वागत व्हायला हवे. आम्ही दिल्लीला जाण्याऐवजी ते राज्यात येत असतील तर ती राजकीय पक्षांना सूचना, भूमिका मांडण्यासाठी चांगली संधी आहे, त्यातून सुसंवाद साधायला सोपे जाईल.
दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, अरविंद केजरीवाल उत्तम काम करत होते. त्यांची टीम चांगली होती. पण एका विशिष्ट स्थितीत केजरीवाल यांना तुरुंगात टाकले गेले. खोट्या केसेस केल्या गेल्या. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. पक्षांतर्गत बैठकीत अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्या कर्तृत्ववान, अभ्यासू व विचारवंत महिला आहेत. या आधीसुद्धा दिल्लीचे नेतृत्व काही महिलांनी केले आहे. दिल्लीचा दर्जा उंचावला, त्यात अतिशी याही सातत्य ठेवतील.
चिन्हासंबंधी राष्ट्रवादीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ते म्हणाले, मला यातील काही माहिती नाही. मी या गोष्टी बघत नाही. वन नेशन वन इलेक्शनबाबत आम्ही एकत्रित बैठक घेणार आहोत. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. माझे मत आत्ताच सांगणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटू
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसंबंधी राज्य शासनाने काही धोरणे आखली. पण शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचले हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यापर्यंत काहीही न पोहोचल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून यात दुरुस्ती करण्याचा आग्रह आम्ही धरू, असे शरद पवार म्हणाले.