(मुंबई)
राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडल्यानंतर आता 4 जून रोजी येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे निवडणूक निकालानंतर एकत्र भाजपासोबत जातील, असा दावा केला आहे. यासंदर्भात आता शरद पवार यांनी मोठं भाष्य एका मुलाखतीदरम्यान केलं आहे.
निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, निकालानंतर कुठले पक्ष भाजपासोबत जातील हे मी सांगू शकत नाही. पण महाराष्ट्रासारखी परिस्थिती देशात निकालानंतर आली तर आमच्यासारखे लोक समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम बनवू आणि जर संधी असेल तर त्याचा पूरेपूर फायदा घेऊ. परंतु उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील याची अजिबात म्हणजे अजिबातच शक्यता नाही. उद्धव ठाकरे भाजपा आणि मोदींसोबत जाणार नाहीत, नाहीत, नाहीत… असं शरद पवार यांनी जोर देऊन म्हटलं.