(मुंबई)
सोशल मीडियावरून ओळख झालेल्या डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अवैझ ताझिम अहमद या प्रियकराविरुद्ध पोलिसांनी सोमवारी (दि.२१) फसवणुकीसह लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महत्वाची बाब म्हणजे बदनामीची भीती दाखवून विवाहित प्रियकराने आतापर्यंत १ कोटी रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहते. दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावरून अवैझ याच्याशी मैत्री झाली होती. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. ती विवाहित असून एक मुलगी असल्याचे त्याला माहीत होते. लग्नानंतर या दोघांचा आपण सांभाळ करू असे त्याने तिला आश्वासन दिले होते. लग्नाचे अमिष देऊन त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले.
लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने तिच्यावर अनेकदा अंधेरीतील एअरपोर्टजवळील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केले होते. तिचा विश्वास संपादन करत काही महिने सर्व सुरळीत सुरू असताना तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. उधारी घेतलेले तिचे सर्व पैसे तो तिला परत करणार असल्याचे सांगत होता; मात्र त्याने तिला कधीच पैसे परत केले नाहीत. त्यामुळे तिने त्याला पैसे देणे बंद केले होते. याच कारणावरून त्यांच्यात खटके उडू लागले आणि तो तिला मारहाण करू लागला.
त्यानंतर दोघांच्या संबंधाविषयीची माहिती नातेवाईक, मित्रमंडळींना देण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. या धमकीनंतर त्याने तिच्याकडून थोडे थोडे पैसे घेत १ कोटी रुपये उकळले. याच दरम्यान तिला अवैझ हा विवाहित असून त्याने केवळ शारीरिक संबंधासाठी तिचा वापर केल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली.