(संगमेश्वर / एजाज पटेल)
गणेशभक्त कोकणात दाखल होत असून, मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कमालीची कोंडी सुरू आहे. आज सकाळ पासूनच महामार्गांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. महामार्गवरील धामणी पेट्रोल पंपापासून थेट संगमेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव स्वतः पोलिसांना घेऊन रस्त्यावर उतरले होते.
आज पासून मुंबई आणि नवी मुंबईसह आदी विविध भागांमधून सध्या चाकरमानी गावाची वाट धरताना दिसत आहेत. तर बुधवारी रात्रीपासून महामार्गावर कोकणात येणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मात्र नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीमध्ये चाकरमानी अडकले असून महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळेही वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढताना दिसत आहे. साधारण तासाभरापर्यंत वाहनं जागीच ठप्प असल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे.
सध्या दोनी मार्गिकांवर वाहनं आल्यामुळं महामार्गावर ही कोंडीची समस्या उद्भवली असून, ही कोंडी जवळपास 6 ते 7 किमीपर्यंत आहे. एसटी, खासगी बस आणि खासगी वाहनांपासून रिक्षा आणि लहान मालवाहू वाहनांच्या गर्दीमुळं मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या या चित्रात पुढील दोन ते तीन दिवसात फारसे बदल दिसणार नाहीत.
या प्रवासात चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये, विशेषतः वाहतूक कोंडीची समस्या फार काळ टिकू नये यासाठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसली आहे. महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. वाहतूक कोंडीची ठिकाणे हेरून तिथं विशेष नियोजन करण्यात आलं आहे. महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते दुभाजक लावण्यात आले असून, यंदा प्रथमच पोलीस यंत्रणा ड्रोनचा वापर करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान या समस्येवर आणखी एक तोडगा म्हणजे महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे शिवाय एसटी बसेसचे थांबे शहराबाहेर करण्यात आले आहेत.