(मुंबई)
ज्येष्ठ पत्रकार आणि मार्मिक साप्ताहिकाचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे आज पहाटे राहत्या घरी झोपेतच निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. सावंत यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात बेस्ट कंडक्टर ते मार्मिकचे कार्यकारी संपादक असा उल्लेखनीय प्रवास केला. त्यांच्या कार्याची दखल घेत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, तसेच मराठी पत्रकार परिषद, मुंबई आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांचे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले होते.
पत्रकारिता करत असताना त्यांना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष स्नेह लाभला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. सावंत यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक धाडसी आणि अभ्यासू व्यक्ती गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.