( रत्नागिरी /प्रतिनिधी )
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने गेल्या तीन दशकात ज्येष्ठांना नवी ऊर्जा देण्यासाठी राबविलेले उपक्रम प्रशंसनीय आहेत. या संघाने आता आपल्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीला देण्यासाठी समुपदेशन कक्ष सुरू करावा आणि ज्येष्ठ नागरिकांनी वृद्धत्व विसरून शरीर आणि मनाने निरोगी राहण्याचा ध्यास घ्यावा, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन अभिजीत हेगशेटये यांनी केले.
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचा २८ वा वर्धापन दिन २८ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांनी उत्साही वातावरणात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री. हेगशेट्ये यांनी संघाच्या वाटचालीचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मारुती अंब्रे हे होते. मान्यवरांच्या हस्ते वयाची ७५ आणि ८५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच वैवाहिक जीवनाची ५० वर्षांची वाटचाल पूर्ण केलेल्या ज्येष्ठ दांपत्यांचा भेटवस्तू, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांनाही गौरविण्यात आले. जेष्ठ नागरिकांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
दैनिक लोकमतच्या वरिष्ठ उपसंपादक तथा आदर्श महिला पत्रकार श्रीमती शोभना कांबळे यांचा संघाच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचारी श्रीमती रवीना रवींद्र चाळके आणि प्लंबर गणपती शंकर कांबळे यांचा कर्तव्यनिष्ठ सेवक म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी प्राचार्य डॉ. दत्ता पवार यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता ज्येष्ठांनी या भाषेला अधिक सन्मान मिळवून देण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. संघाचे पदसिद्ध मार्गदर्शक श्यामसुंदर सावंत देसाई, उपाध्यक्ष राजेंद्र कदम, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर, माजी प्राचार्य प्रतापराव सावंत देसाई, विनायक हातखंबकर, दिलीपराव साळवी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मारुती अंब्रे यांनी गेल्या २८ वर्षांची संघाची वाटचाल ज्येष्ठांना नवी भरारी देणारी ठरल्याचे सांगून ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना देण्यासाठी या संघात सभासद म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले.
वर्धापन दिनाच्या यशस्वीतेसाठी सचिव सुरेश शेलार, सुधाकर देवस्थळी, मुकुंद जोशी, प्रकाश शिंदे, श्रीमती शुभांगी भावे, वंदना कोतवडेकर, वृषाली घाणेकर आदींनी परिश्रम घेतले. डॉ. मनोहर चांडगे यांनी आभार मानले. साने गुरुजींच्या प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.