(गुहागर)
तालुक्यात अर्धांगवायू आजारावर बनावट औषधांची विक्री करणाऱ्या सोलापुरातील एकाला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. त्याने गुहागरातील अडूर- भाटलेवाडी येथील लोकांकडून औषधासाठी १९,३०० रुपये घेतल्याचेही पुढे आले आहे.
चंद्रकांत पांडुरंग वायकर (माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुहागर तालुक्यात अर्धांगवायू आजारावर औषध विकण्यासाठी चंद्रकांत वायकर हे गेले तीन दिवस गाडी घेऊन गाव- वाडीवार फिरत होते. काही गावांमध्ये त्याने या औषधावर बरेच पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
अनेकांनी औषध खरेदीसाठी पैसेही दिले होते. ही गाडी फिरताना दिसताच गुहागर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले होते. पोलिस पाटील, जागरूक नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर चंद्रकांत पांडुरंग वायकर यांच्यावर गुन्हा नोंदवत अटक केली आहे.