(गणपतीपुळे / वैभव पवार)
सिनर्जी मरीन ग्रुप व जलजीविका यांच्यावतीने नवी मुंबईतील टी .एस.रहमान मर्चंट नेव्ही कॉलेज येथे प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतातील अनेक कानाकोपऱ्यातील उत्सुक मुली निवडल्या गेल्या. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आधुनिक मराठी कवितेचे जनक असलेल्या कविवर्य केशवसुतांच्या ‘मालगुंड’ या जन्मभूमीतील सुकन्या सेजल राकेश मयेकर हिची मर्चंट नेव्ही प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. सध्या ती चेन्नई येथे सहा महिन्यांच्या मर्चंट नेव्ही प्रशिक्षणासाठी दाखल झाली आहे.
सिनर्जी मरीन कंपनीच्या चक्रास स्कॉलरशिपसाठी रत्नागिरी तालुक्यातील शिरगावमधील जलजीविका कार्यालयाचे अधिकारी मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये माहिती देण्यासाठी आले होते. यावेळी या स्कॉलरशिपसाठी सेजलने आपला अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये संपूर्ण देशातील दोनशे मुलींनी सहभाग घेतला होता. पुणे, मुंबई , झारखंड,राजस्थान या ठिकाणच्या मुली सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये 11मुली परीक्षा पास झाल्या तर 11 मधील फक्त सहा जणी मुलाखतीसाठी पात्र ठरल्या. त्यामध्ये मालगुंड भंडारवाडा येथील नामांकित व्यवसायिक राकेश मयेकर यांची कन्या सेजल राकेश मयेकर हिची निवड करण्यात आली.
सेजल ही लहानपणापासूनच अतिशय हुशार, जिद्दी आणि धाडसी विद्यार्थिनी असून तिने रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये आपले शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले .त्यानंतर तिने मर्चंट नेव्ही प्रशिक्षणासाठी सहभाग घेतला आहे. या मर्चंट नेव्हीमध्ये सहभागी झालेल्या सेजलसह अन्य मुलींना सिनर्जी मरीन ग्रुप यांच्यातर्फे जी.पी.रेटिंग आणि डीएनएस यासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या स्कॉलरशिपचा भाग म्हणून कौतुक सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील टी.एस. रहमान मर्चंट नेव्ही कॉलेज मध्ये करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या मुली परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सर्व मदत सिनर्जी मरीन ग्रुप करणार आहे.
सेजलच्या उज्वल वाटचालीमध्ये तिचे आई-वडील यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. यावेळी आपल्या आई-वडिलांचे मोठे प्रोत्साहन आणि पाठिंबा लाभल्याचे सेजलने “रत्नागिरी 24 न्यूज” जवळ बोलताना सांगितले.सेजल मयेकरची मर्चंट नेव्ही प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने संपूर्ण मालगुंड गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, शालेय शिक्षक आणि विविध स्तरातून तिचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.