(लांजा)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ साठी आरक्षित केलेला विकास निधी नगर पंचायतीने अन्य प्रभागात वळविल्याने लांजा बौद्धवाडीतील नागरिक आक्रमक झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे न्याय मागण्यात आला असून, वेळ पडल्यास मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागणार असल्याचे प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक लहू कांबळे यांनी सांगितले. आपल्या प्रभागाचा व हक्काचा निधी अन्य प्रभागात वळविण्याचे कारण काय? असा प्रश्न लहू कांबळे व बौद्धवाडीतील नागरिकांनी केला आहे. याबाबत लांजा ग्रामस्थ बौद्धजन मंडळ ग्रामीण विभाग व महिला मंडळ लांजा नगरपंचायतीला पत्र देत आपला संताप व्यक्त केला आहे. अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणेतून प्राप्त झालेला विकास निधी आमच्या हक्काचा निधी आहे. मात्र, राजकीय दबावाखाली येऊन हा निधी दुसऱ्या प्रभागात वळविण्यात आला आहे. आम्हाला आमच्या नगरसेवकामार्फत तारीख व वेळ द्यावी, तोपर्यंत हा निधी कोणत्याही प्रभागात खर्च करू नये. निधी खर्च केल्यास आपण मागासवर्गीयांवर अन्याय करत आहात, असे समजून आम्ही नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
लांजा नगरपंचायत प्रभाग क्रमांक ४ हा विशेष घटक लाभार्थी म्हणून आरक्षित प्रभाग आहे. केवळ संख्याबळाच्या जोरावर व प्रशासकीय अध्यादेशाला बगल देत आरक्षित प्रभागातील मंजूर विविध विकासकामे नगरसेवकांना डावलून बदलली गेली आहेत. लांजा नगरपंचायत विशेष सभेमधील ठरावांना विरोध असल्याने ३०८ खाली ही कामे थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे. न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे लहू कांबळे यांनी सांगितले.