(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील आरजू टेक्सोल कंपनीने नागरिकांची करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीची ही घटना जून २०२१ ते २३ मे २०२४ या कालावधीत घडली होती. या फसवणुकीच्या प्रकरणात आता दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं. कलम 420 वगैरे अन्वये “आरजू टेक्सोल कंपनी” विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्याने अधिक तपास रत्नागिरी पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत दोन इसमांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. संजय गोविंद केळकर (वय ४९ वर्षे, रा. घर नं. ३५०, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी-हातखंबा ता. जि. रत्नागिरी) यास दि. २६ मे २०२४ रोजी साडेसहा वा. अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ३१ मे २०२४ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.
तसेच या प्रकरणातील दुसरा संशयीत आरोपी प्रसाद शशिकांत फडके (वय ३४, वर्षे, रा. घर नं. ७२, ब्राम्हणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी, ता. जि. रत्नागिरी) याला दि. २८ मे २०२४ रोजी ००.१२ वा. अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या माध्यमातून फसवणूक करणारे अन्य आरोपी नजरेआड आहेत. मात्र रत्नागिरी पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक केले आहे. यासोबत या प्रकरणी बळी पडलेल्या 115 लोकांचे पोलीसांकडून जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. तक्रार नोंदवू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत EOW कार्यालयात भेट द्यावी अशी पोलिस प्रशासनाकडून विनंती केली आहे. ज्यांची हया कंपनीकडून फसवणूक झाली आहे त्या सर्वांच्या साक्षी नोंदविण्यात येतील, असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.
टप्प्या-टप्प्याने जबाब नोंदवणार…
संबंधित कंपनीत गुंतवणुकीचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून तुम्हाला मिळालेला कोणताही पत्रव्यवहार यासह सर्व संबंधित कागदपत्रे सोबत आणवीत. यासोबत जबाब नोदंविण्याकरिता ज्या नागरिकांनी संबंधित कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि ज्यांच्या तक्रारी नोंदवण्याची इच्छा आहे अशा नागरिकांशी EOW जबाब नोंदविण्याकरीता भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी आपल्याला टप्या-टप्याने संपर्क करून बोलावण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तातडीच्या शंका समस्यांसाठी हेल्पलाईन नंबर
सर्व नागरिकांनी शांतता व संयम राखावा तसेच कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी. रत्नागिरी पोलीस दल प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक हाताळणी करण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणत्याही तातडीच्या शंका किंवा समस्यांसाठी, कृपया डायल-112 वर अथवा आमच्या हेल्पलाइन नंबर +919421137380 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.