( नवी दिल्ली )
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
देशाला आर्थिक संकटाच्या काळात टिकवून ठेवणारे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ओळख होती. २००४ ते २०१४ या काळात मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते.
३ एप्रिल रोजी झाले होते निवृत्त
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे ३ एप्रिल २०२४ रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले. तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. मनमोहन सिंग यांच्या अनेक निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे रुप बदलले. मनमोहन सिंग १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर गेले होते. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्र्याची जबाबदारी सांभाळली होती. या काळातच अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधान देखील राहिले आहेत.
मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास
1991 मध्ये मनमोहन सिंग आसामचे राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. यानंतर ते 1995, 2001, 2007 आणि 2013 मध्ये पुन्हा राज्यसभेचे खासदार होते. 1998 ते 2004 पर्यंत भाजप सत्तेत असताना मनमोहन सिंग हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 1999 मध्ये त्यांनी दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत येताच त्यांना पंतप्रधान करण्यात आले. 2009 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली आणि पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्यात आले.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राहिले आहेत. 1982 ते 1985 या आपल्या कार्यकाळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अनेक कामे केली. मनमोहन यांनी संयुक्त राष्ट्रातही काम केले आहे. 1966-1969 या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी आर्थिक व्यवहार अधिकारी म्हणून काम केले.
30 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले
मनमोहन सिंग यांच्या आर्थिकउदारीकरणाच्या धोरणांनी देशाला गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केले. या धोरणांमुळे देशातील 30 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. त्यानंतर देशात खाजगी क्षेत्राचा विस्तार झाला, त्यामुळे कोट्यवधी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. शिवाय अनेक बाबतीत आयातीवर अवलंबून असलेला भारत आज जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्यातदारांपैकी एक बनला आहे.