(साखरपा / दीपक कांबळे)
संगमेश्वर तालुक्यात जोरदार व सुसाट्याच्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने लोकांची भंबेरी उडवली आहे. पावसाचा मोठा फटका दाभोळे भागाला बसला असून तेथील घरांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
आज सोमवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला असल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने गावातील पड्यारवाडी, बेलकरवाडी, सोनारवाडी, बौद्धवाडी, परडेवाडी, गुरवाडी आदि ठिकाणी घरावरील व गोठ्यांवरील पत्रे, कवले खूप दूरवर उडून गेली. त्याचबरोबर दाभोळे खुर्द येथील सरकार मान्य रास्त दराचे धान्य दुकानाचे पत्रे उडून आतील धान्य भिजून गेले आहे. तसेच हॉटेल मंथन वरील बरेचसे पत्रे उडून गेल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.
झाडांच्या फांद्या मोडून घरावर व गोट्यांवर पडलेल्या अवस्थेत आहे. जोरदार पावसाने लोकांची भंबेरी उडाली आहे. नुकसानग्रस्त भागात दाभोळे गावचे तलाठी चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली व सुमारे दोन लाखापर्यंत एकूण नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान पोहोचलेल्या शेतकऱ्यांना व व्यवसायिकांना शासनाने तात्काळ मदत देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.