(संगमेश्वर / एजाज पटेल)
शांततामय व संविधानिक मार्गाने आतापर्यंत निवेदन देऊन रस्ता कामाच्या अनुषंगाने काहीच हालचाली न झाल्याने संगमेश्वर येथील संभाजी नगर येथील ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून तसे निवेदन प्रसिद्धी साठी प्रसारमाध्यमाना दिली आहेत.
सुमारे शंभर पेक्षा अधिक सह्या असलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडून असलेला व संगमेश्वर येथील संभाजी नगरकडे जाणारा अवघ्या पाचशे मीटर अंतराचा असलेला हा रस्ता लाल मातीचा कच्चा रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, लहान-मोठे दगड -धोंडे पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे पडलेले चरी या सर्वांमुळे रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली आहे.
सुमारे पाचशे पेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या संभाजी नगर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहही आहे. मात्र वस्तीतील लोकांना तसेच वसतिगृहातील मुलांना या एकमेव रस्त्याशिवाय अन्य पर्यायी रस्ता नसल्याने गेले सहा दशकापासून याच जीवघेण्या व अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्यावरूनच वाहनाने असो वा पायी जीव मुठीत घेऊन प्रवास करणेच नशिबी आहे. शाळेत जाणारी लहान मुलं, रुग्ण, वयोवृद्ध यांचे तर या रस्त्यामुळे अतोनात हाल होत आहेत.
गेल्या साठ वर्षात अनेक सरकारे आले. अनेक राज्यकर्ते होऊन गेले, मात्र आज पर्यंत या सर्वांकडे पक्का रस्ता व्हावा यासाठी अर्ज विनंत्या करण्यात आल्या परंतु या अर्ज आणि विनंत्यांना केराचीच जागा दाखवण्यात आली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण आज पर्यंत आलेल्या राज्यकर्त्यांनी याची दखल न घेतल्यानेच सहा दशक उलटून गेली तरी परिस्थिती “जैसे थी वैसे” च असल्याचे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर या वस्तीत सुमारे 350 मतदार असून निवडणुका आल्या की सर्वच पक्षांच्या पुढारी आणि नेतेमंडळीच्या नजरा या वस्तीकडे आणि येथील मतांकडे लागलेले असतात. या वेळी ही मते पदरात पाडून घेण्यासाठी रस्ता प्रश्न मार्गी लावू असे गेली साठ वर्षाहून अधिक काळ नुसते आश्वासनच पदरी पडत आहेत. त्यामुळे आता येथील लोकांनी रस्ता प्रश्न मार्गी न लावल्यास येत्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय आयोजित सभेत घेतला घेतला असून आता आश्वासन नको, तर रस्ता हवा, रस्ता नाही तर व्होटींग नाही, असा एल्गार येथील ग्रामस्थांनी पुकारलेला आहे.