(संगमेश्वर / प्रतिनिधी)
नावडी संगमेश्वर भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लोवले गावातून संगमेश्वरकडे आणण्यात आली आहे. या पाईपलाईनला गळती निर्माण झाल्याने पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेली माती गेले पंधरा दिवस रस्त्यावर तशीच टाकून ठेवल्याने गंभीर अपघात घडण्याची भीती वाहनचालकाने आणि पादचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरुखने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
लोवले नवनिर्माण महाविद्यालया नजीकच्या एका वळणावर रस्त्याच्या बाजूने जमिनीखालून गेलेल्या पाईपलाईनला गळती निर्माण झाली होती. गेले अनेक महिने या पाईपलाईन मधून येणारे पाणी रस्त्यावर इत:सतता पसरत होते. या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पंधरा दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला जेसीबी द्वारे खणण्यात आले. खोदलेली माती शेताच्या बाजूला टाकण्याऐवजी तिथे रस्त्यावरच टाकून ठेवली गेली. सदर माती रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत आलेली आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर सदरची माती परत खोदलेल्या भागात टाकणे आवश्यक असताना, ही माती अर्ध्या रस्त्यावर तशीच ठेवण्यात आली आहे.
येथे वळण असल्याने संगमेश्वर कडे जाणाऱ्या गाड्या आधीच काहीशा उजव्या बाजूने जातात. त्यातच पाईपलाईन ची माती रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत आल्याने येथे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी देवरुख होऊन संगमेश्वर कडे येणारी बस येथून काही अंतरावरील वळणावर कठड्याला आपटून मोरीत गेली होती. हा रस्ता अपघात प्रमाणे क्षेत्र असताना गेले पंधरा दिवस रस्त्यावर मधोमध टाकलेली माती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि अभियंत्यांना दिसू नये, हे दुर्दैवी असल्याचे मत वाहन चालक आणि पादचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग करत असलेले दुर्लक्ष एखाद्या दुचाकी स्वाराच्या अथवा वाहन चालकाच्या जीवावर बेतू शकते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सकाळच्या वेळी संगमेश्वर अथवा लोवले येथून चालण्यासाठी येणाऱ्या पादचाऱ्यांना देखील या मातीमुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. गेले पंधरा दिवस रस्त्यात माती टाकून ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदारावरही बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1