(संगमेश्वर)
मुंबई-गोवा महामार्गावरील आणि संगमेश्वर तालुक्याच्या मध्यवर्ती असलेले संगमेश्वर बसस्थानक आता कात टाकणार आहे. गेली अनेक वर्षे बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमेश्वर बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत हे बांधकाम होणार आहे. त्यामुळे या बसस्थानकाला नवी झळाळी मिळणार आहे.
संगमेश्वर बसस्थानक समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. बसस्थानक परिसरात दुर्गंधीसह भिंतीही धोकादायक बनल्या होत्या, त्यामुळे सर्व सुविधांनी युक्त असे संगमेश्वर बसस्थानक होणे गरजेचे बनले होते. याचा विचार करून या कामाच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानकाच्या आवारातील खोकेधारकांना आदेशवजा नोटीस काढून खोके खाली करण्यास सांगितले आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर अनेकांनी आपले खोके हटविले आहेत.
संगमेश्वर बसस्थानकाचे बांधकाम ठरलेल्या मुदतीमध्ये पूर्ण हवे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे; परंतु सद्य:स्थितीमध्ये चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकाचे काम रखडले आहे. त्यामुळे तेथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर खोकेधारकांचा व्यवसाय संकटात आला आहे. त्याचप्रमाणे संगमेश्वर बसस्थानकाचे काम रखडल्यास प्रवाशांसह व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे, तसेच पावसाळाही जवळ आला असून, त्यापूर्वी काम होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या बसस्थानकाचे काम लवकर हाती घेऊन ते संपवावे, या अशी मागणी करण्यात येत आहे.
Also Read : गणपतीपुळे प्राथमिक शाळेला कोकण आयुक्त बलवंत सिंह यांची भेट: शाळेच्या विविध उपक्रमांचे केले विशेष कौतुक !