(दापोली)
दापोली तालुक्यातील पांगारी मार्गावरील उर्फीनजीक वाळूने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मंगळवारी (दि. २२) रोजी ही घटना घडली तर बुधवारी २३ रोजी हा डंपर क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे दापोलीत बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दाभिळ, पांगारी, दाभोळ आदी भागात गेले कित्येक दिवस बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जात आहे.
खेड तालुक्यातील कर्जी या भागातूनही बेकायदेशीर वाळूची वाहतूक दापोलीत केली जात आहे. दाभोळ, पांगारी, दाभिळ या भागात राजरोस वाळूचे डंपर फिरत असताना महसूल विभाग मात्र कोणतीही कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. त्यामुळे या भागात बिनबोभाट बेकायदेशीर वाळू विक्रीचा खेळ सुरू आहे. वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यास महसूल विभाग गप्प का, असाही सवाल या नंतर उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या मार्गावर होणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक, पोलिस यंत्रणा आणि महसूल विभाग यांनी रोखावी, अशी मागणी होत आहे.