(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यात करजुवे, माखजन, कासार कोळवण, आंगवली अशा अनेक ठिकाणी राजरोस वाळू उपसा व वाहतूक होताना दिसत आहे; परंतु याक स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. आंगवली येथील बावनदी पात्रात अनेक वर्षे हा व्यवसाय सुरू आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर जोगळे यांनी केला आहे.
याबाबत जोगळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संगमेश्वर तालुक्यातील मंडळ अधिकारी सजा आंगवली कार्यक्षेत्रातील बावनदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसाप्रकरणी शासकीय यंत्रणा, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, उपसरपंच व तक्रारदार यांच्याकडून पाहणी, पंचनामे करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने अंदाजे ९०० पेक्षा जास्त ब्रास उत्खनन, खड्डे व ढिगारे प्रत्यक्ष आढळून आले आहेत. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणचे व्हिडिओ, फोटो काढले असून अधिकारी यांनी किती ब्रास उत्खनन केल्याचे कागदावर दाखवले याची संपूर्ण माहिती माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत मागवणार असल्याचे ही जोगळे यांनी सांगितले.
नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आता जागृत होणे आवश्यक असल्याचे महासंघाचे अधिकारी यांनी आवाहन केले आहे. गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन लढा द्यावा, असेही आवाहन करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार, याकडे संगमेश्वर तालुका महासंघाचे लक्ष असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाच्या नद्यांमधून माफियांकडून उत्खनन केलेली वाळू साठवून त्याची दिवसरात्र वाहतूक केली जाते मात्र असे असतानाही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. हे वाळू माफिया दररोज उत्खनन करून ही प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच हे वाळू माफियाराज सुरू आहे का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
उत्खनन आढळले तरी…
दरम्यान, वाळू उपसाप्रकरणी माहिती मिळताच मंडळ अधिकारी आणि टीम घटनस्थळी दाखल झाली. त्यावेळी वाळू उत्खनन आढळले मात्र जागेवर कोणतेही वाहन किंवा व्यक्ती सापडली नाही. त्यामुळे दंड कसा आकारणार, असा पेच महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांपुढे असल्याचे समजते.
पर्यावरणातील अस्तित्वच नष्ट करण्याचे गंभीर पाप
तालुक्याला शास्त्री, बावनदी या नद्यांच्या अस्तित्वाने मोठी समृद्धी प्रदान केली आहे. या नद्यांनी संपूर्ण पिण्याच्या पाण्यासह कृषि, उद्योगांची तहान भागवत असतात. या प्रमुख नद्यांसह अन्य उपनद्यांचेही त्यात योगदान असून शास्त्री नदीच्या प्रवाहातून सिंधू सागरात विलीन होतात. पण, ही समृद्धी पर्यावरणाच्या शत्रूंना काही पाहवली जात नाही. म्हणून नद्यांचे पात्र ओरबाडून तिचे पर्यावरणातील अस्तित्वच नष्ट करण्याचे गंभीर पाप वाळू माफियांनी चालविले आहे. या नद्यांची खरी समृद्धी वाळू माफियांनीच नष्ट करणे सुरु केले आहे. आणि त्यातून हे माफिया कित्येक पटीने गडगंज होताना दिसतात.
काही दिवसांपूर्वीच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आदेश
संगमेश्वर, व रत्नागिरी तालुक्यात काही महत्त्वाच्या नद्याच्या परिसरात अवैधरित्या वाळू माफियांचा उच्छाद सुरु होता. यामध्ये करजुवे सुतारकोंड विचारेवाडी आणि वातवाडी तसेच रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे वाळू उत्खनन बिनबोभाट सुरू होते. याकडे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी गांभिर्याने लक्ष वेधून संगमेश्वर तहसीलदार, रत्नागिरी तहसीलदार तसेच खनिकर्म विभागाला चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र कारवाई करण्यापूर्वीच सुरू असलेले वाळू उत्खनन बंद झाले होते. मात्र अधिकाऱ्यांना सापडलेले मोठं-मोठें वाळूच्या डेपोवर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.