(रत्नागिरी)
शरीरसौष्ठवच्या बेकायदेशीर इंजेक्शन व औषधांचा साठा केलेल्या घरावर छापा टाकून पोलिसांनी ३,७२८ रुपये किमतीची इंजेक्शन्स व औषधे जप्त केली आहेत. ही कारवाई रत्नागिरीतील दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मिरजोळे येथे केली असून, औषधांचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या साईराज रमेश भाटकर (२६, रा. एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी) याला अटक केली आहे.
शरीराचे सौष्ठव वाढावे, यासाठी उपयुक्त असल्याचे सांगून शरीराला घातक ठरणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची इंजेक्शन्स् व औषध बेकायदेशीरपणे बाळगून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील एमआयडीसी परिसरातील साईराज भाटकर याच्या घरावर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांना इंजेक्शन व औषधांचा बेकायदेशीर साठा आढळला. ही औषधे खरेदी व विक्रीसाठी ड्रग्ज आणि कॉस्मेटिक अॅक्ट १९४० अंतर्गत परवाना आवश्यक आहे. मात्र, असा कोणताही परवाना साईराज भाटकर याच्याकडे नसल्याचे पोलिस तपासात पुढे आले. तसेच ही औषधे केवळ डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनद्वारेच विक्री करणे बंधनकारक आहे. विक्रीचा कोणताही परवाना नसताना, औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना त्याची विक्री करत असल्याचे पुढे आले आहे.
पोलिसांनी सर्व इंजेक्शन व औषधांचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत ३,७२८.४० रुपये इतकी आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७५, २७८, १२३, १२५ अन्वये गुन्हा दाखल करून साईराज भाटकर याला अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.