(साखरपा / वार्ताहर)
संगमेश्वर तालूका माजी सभापती जया माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साखरपा पंचक्रोशीमधील स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा, या हेतूने मागील 3 वर्ष प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येते. यंदाही मोठ्या उत्साहात चॅलेंजर क्रीडामंडळ व जुगाई सेवा मंडळ भंडारवाडी यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.
परिसरातील मागील 3 वर्षे या स्पर्धेने एक चांगली उंची गाठली आहे. या स्पर्धेत यंदा भडकंबा वॉरियर्स, जय भवानी बाईतवाडी भडकंबा, दिपलक्ष्मी ट्रॅव्हल्स,सतीमाता जाधववाडी, चॅलेंजर भंडारवाडी, बाळूमामा ट्रॅव्हल्स हे संघ यंदा सहभागी झाले आहेत. विजेत्याला यंदा 30,000/- रोख रक्कम आणि आकर्षक चषक, उपविजेत्याला 20,000/- रोख रक्कम आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना बक्षीसे देण्यात येणार आहेत. तर मालिकाविरास एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ 20 जानेवारीला तर अंतिम सामना 22 जानेवारीला 4 वाजता खेळविण्यात येईल. या स्पर्धेत लिलाव प्रक्रियेने 12 जानेवारीला संघाची विभागणी झाली आहे. यंदाच्या पर्वात कोण विजयी ठरणार याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमिना लागली आहे. ही स्पर्धा कै. भाऊराव सरदेशपांडे क्रीडासंकुल, साखरपा याठिकाणी पार पडणार आहे. सर्व क्रीडाप्रेमिनी स्पर्धेचा आंनद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे