(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील 28 गावांचा समावेश असलेल्या सागरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी ए.बी. खेडकर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ते रुजू झाले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1996 ला पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी मुंबई येथील सांताक्रुज पोलीस स्टेशनमधून आपल्या पोलीस सेवेला सुरुवात केली. त्यानंतर आझाद मैदान, निर्मल नगर आदी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. पोलीस सेवेतील प्रारंभापासून जवळपास 22 वर्षे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सेवा बजावल्यानंतर रायगड आणि आता रत्नागिरी पोलीस दलामध्ये बदली झालो असून सागरी पोलीस ठाणे नाटेचे प्रभारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
खेडकर रुजू झाल्यानंतर परिसरातील सामाजिक, राजकीय तसेच अनेक संस्था, संघटना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले आहे. प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर आयलॉग जेटी, नाणार, बारसू रिफायनरी प्रकल्प, त्याला होणारा विरोध आणि आंदोलने यामुळे महत्त्वाच्या असणाऱ्या या पोलीस स्टेशनच्या प्रभारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्यासमोर प्रस्तावित प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर त्यांचेसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न व आव्हान असणार आहे.
या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना सागरी सुरक्षेबरोबरच, साखरी नाटेसारखे महत्त्वाचे मच्छीमारी केंद्र तसेच या भागात असलेल्या अनेक आंबा बागायती आणि त्या अनुषंगाने नेपाळी आणि अन्य परप्रांतीय खलाशी आणि मजुरांची वाढती संख्या, तसेच काही गावांमध्ये सुरू असलेले गावठी दारू विक्री, मटका व्यवसाय यासारखे अवैध धंदे आणि त्या अनुषंगाने होणारे गुन्हे यावर अंकुश ठेवावा लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावांमध्ये चोरी आणि दरोड्याचे प्रमाण वाढत असल्याने तेही त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. जवळपास 22 वर्षे पेक्षा अधिक काळ देशाच्या आर्थिक राजधानीत सेवा बजावलेले खेडकर पोलीस आणि जनता सुसंवाद राखत कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी चोख बजावतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.