( रत्नागिरी )
महावितरणने नियुक्त केलेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ आहे. कंत्राटी कर्मचारी सुबोध रवींद्र साळवी (वरची निवेंडी), कुंदन दिनेश शिंदे (फणसवळे) यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न उघडकीस आला आहे. किमान आतातरी याविषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिक्सचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर युवकांना एक वर्ष अँप्रेंटीशिप करावी लागते. त्यानंतरच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होते. महावितरणने कंत्राटी कामगार पुरविण्यासाठी मुंबईतील एका कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीने ३९२ कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांना खांबावर चढून वीज पुरवठा चालू, बंद, दुरुस्ती तसेच अनेक कामे करावी लागतात.
दहा कंत्राटी कामगारांच्या मागे एक कीट
परंतु त्यांना आवश्यक असलेले सेफ्टी टूल कीट मात्र कंपनीकडून पुरविण्यात आलेले नाहीत, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दहा कंत्राटी कामगारांच्या मागे एक कीट देण्यात येते. त्यामुळे ते नेमके कुणी वापरावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. कंपनी ठेकेदाराचे रत्नागिरीत कार्यालय नाही, त्यामुळे प्रश्न कुणापुढे मांडावे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे. कुंदन शिंदे याच्या मृत्यूनंतर सर्वच कंत्राटी कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी सेफ्टी कीट सर्वांसाठी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
कंत्राटी कर्मचारी संतप्त
मराठी कर्मचारी आयटीआय उत्तीर्ण असतानाही त्यांची नियुक्ती अकुशल कर्मचारी अशी करून कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. कुंदन शिंदे याच्या अपघाती मृत्यूनंतर कंत्राटी कर्मचारी संतप्त झाले असून, रत्नागिरीतील अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आतातरी यात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा केली जात आहे.