(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील निवळी येथील किरण रघुनाथ साळवी यांच्या किरण फार्म हाऊसमधील आंबा बागेत असलेल्या उघड्या विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर विहिरीत पिंजरा सोडून एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात वन विभागाला यश आले. हा बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर रोजी मौजे निवळी-गावडेवाडी येथील जाकादेवी मंदिरालगत किरण रघुनाथ साळवी यांचे किरण फार्म हाऊस आहे. येथील आंबा बागेत पंपघराशेजारी असलेल्या उघड्या विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती निवळी गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय निवळकर, गावच्या पोलीस पाटील वार यांनी वन विभागाला दिली. त्यानुसार विनाविलंब वन विभाग रेस्क्यू टीमचे साहित्य घेऊन शासकीय वाहनांमध्ये पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची पाहणी करता कठडा असलेली ही विहीर पक्की व गोल असून, विहिरीची लांबी अंदाजे ७५ ते ८० फूट खोल होती. या विहिरीत बिबट्या पाण्याच्या वर सुरक्षित बसलेला दिसून आला.
शासकीय वाहनातून पिंजरा उतरवून पिंजऱ्याला दोऱ्या बांधून हा पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यास वन विभागाला यश आले. हा पिंजरा विहिरीबाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता नर जातीचा हा बिबट्या सुमारे चार वर्षे वयाचा असून, सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले.
रेस्क्यूची कार्यवाही ही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वन संरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी (रत नागिरी), वनपाल (पाली) न्हानू गावडे, वनरक्षक (रत्नागिरी) प्रभू साबणे, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, तसेच पोलीस हवालदार लक्ष्मण कोकरे, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश भिसे, गावचे पोलीस पाटील पवार, पोलीस पाटील शितप, संजय निवळकर, अनिकेत मोरे, महेश धोत्रे, स्वस्तिक गावडे, शाहिद तांबोळी तसेच गावातील सगळे ग्रामस्थ उपस्थित होते. संजय निवळकर व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा कोणताही वन्यजीव संकटात सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.