(दापोली)
दापोली तालुक्यातील जि. प. शाळा सडवे नं.१ शाळेचा अमृत महोत्सव व स्नेहसंमेलन सरपंच वसंत मेंगे यांचे अध्यक्षतेत अनेकविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाले. गावातील सर्व ग्रामस्थांकडून सदर सोहळ्याचे अयोजन करण्यात आले होते.
उपसरंच राजेश भेकरे ग्राम अध्यक्ष प्रकाश मंगे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश मेंगे, उपाध्यक्ष अजीत वाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष महेश पादड, माजी तंटामुक्त अध्यक्ष जयेंद्र कावणकर, पोलीस पाटील रोशन पादड, अंगणवाडी सेविका मनाली वाळंज, साक्षी भेकरे, आशा सेविका ज्योती वाडकर, गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, माजी विद्यार्थी, माजी शिक्षक यांच्या उस्थितीमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक
मुख्याध्यापक शामराव वरेकर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका नेहा उकसकर व शाळेच्या माजी शिक्षिका-सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्रीमती मंगल सणस यांनी केले.
दिवसभर चाललेल्या सोहळ्यात प्रारंभी शाळेला १२ गुंठे जमीन विनामोबदला देणार्या कै.महादेव सोनू कावणकर (बाबा कावणकर) यांचे सुपुत्र श्री व सौ.सुरेश कावणकर यांचे हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. तद्नंतर महिलांसाठी हळदीकुंकू,सायंकांळी ,ग्रामस्थांचे सुस्वर भजन झाले व भोजनानंतर रात्री शाळेतील सर्व माजी शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच अनेक माजी विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करणेत आला.
“ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा”या उक्तीप्रमाणे अनेकांनी आपले शाळेविषयी अनुभव विषद केले. दरम्यान अमृत महोत्सवासाठी मिशन आपुलकी अंतर्गत ग्रामस्थांकडून सुमारे दिडलाख रुपये वस्तू रुपात शैक्षणिक उठाव जमा झाला. तसेच माजी विद्यार्थ्यांकडून सर्व वर्गात पंखे, वाॅल पेपर आदि मुख्या. वरेकर यांचेकडे सुपुर्द करण्यात आले. रात्री मुलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये प्लॅस्टिक बंदी, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, पाण्याचा वापर आदि विषयांवर समाज प्रबोधनपर किर्तन करण्यात आले. यावेळी अबालवृध्दानीही ठेका धरलेला पहायला मिळाला.
या अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी गावातील सर्व वाडी प्रमुख, सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सचिव व महिला मंडळांनी सहकार्य केलेबद्दल शिक्षक विकास पटले यांनी सर्वांचे ऋणनिर्देशन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.