(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावच्या माजी सरपंच लिला जयवंत घवाळी यांच्या मातोश्री सुनंदा जयवंत घवाळी यांचे ०६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या.
सुनंदा घवाळी या अतिशय कष्टाळू, प्रेमळ, मनमिळावू व परोपकारी होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात चारही मुलांचा चांगला सांभाळ करून आणि प्रचंड काबाडकष्ट व मेहनत घेऊन कुटुंबाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली. अतिशय साधी राहणी आणि सर्वांशी आदराने वागणे अशा स्वरूपात त्यांनी अनेकांची मने जिंकली होती. तसेच आपल्या मुलांवर अतिशय चांगले संस्कार केल्यामुळेच त्यांची कन्या लिला घवाळी यांनी आपले शिक्षण पूर्ण करून राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अगदी तरुण वयातच मालगुंड गावच्या सरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान पटकावला होता. हा बहुमान त्यांच्या मातोश्रीसाठी खूप मोठा आनंद मिळवून देणारा आणि कौतुकास्पद ठरला होता.
सुनंदा घवाळी यांनी संपूर्ण आयुष्यात आपल्या चारही मुलांवर खूप प्रेम आणि जीवापाड माया केली. मात्र, त्यांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांचा आधारवड निघून गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. सुनंदा घवाळी यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी, त्यांचे सर्व नातेवाईक आणि मालगुंड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्ययात्रेला उपस्थित होते. त्यांच्यावर मालगुंड गायवाडी येथील स्मशानभूमीत आज सात डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण मालगुंड गावातून शोक व्यक्त करण्यात आला.