(रत्नागिरी)
कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताने अजरामर झालेले सं. ययाती आणि देवयानी हे नाटक पाहण्याची संधी रत्नागिरीतील संगीत नाट्यरसिकांना मिळणार आहे. हे सुरांनो चंद्र व्हा, प्रेम वरदान स्मर सदा, सर्वात्मका सर्वेश्वरा अशी एकापेक्षा एक सरस नाट्यपदे असलेले, भाषासौंदर्य, शब्दसौंदर्य व शब्द रचना यांचा सुरेखा संगम असलेले व साहित्यिक सौंदर्यांनी प्रचिती देणारं मराठी संगीत नाटक परंपरेतील हे उत्कृष्ट नाटक आहे. संगीत ययाती आणि देवयानी हे नाटक अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी या संस्थेतर्फे शुक्रवार दि. १९ रोजी रात्री ९.३० वाजता स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सादर होणार आहे.
नुकतेच या नाटकाचे सादरीकरण या संस्थेच्या जुन्या, नव्या दमाच्या कलाकारांनी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत सादर करून तेथील रसिकांची वाहवा मिळवली आहे. या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक गणेश जोशी व संगीत मार्गदर्शन चिपळूणच्या सौ. स्मिता करंदीकर यांनी केले आहे. तबलासाथ हेरंब जोगळेकर व ऑर्गनसाथ अमित ओक करणार आहेत. नृत्यदिग्दर्शन पूर्वा जोगळेकर, नेपथ्य, रंगभूषा रामदास मोरे, नेपथ्य सहाय्य मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे, सुधाकर घाणेकर, प्रकाशयोजना यश सुर्वे, पार्श्वसंगीत अक्षय पेडणेकर, वेशभूषा प्राजक्ता जोशी, निर्मितीप्रमुख राजेंद्र पटवर्धन, अनंत आगाशे व सूत्रधार श्रीनिवास जोशी आहेत. या नाटकाला विशेष सहाय्य खल्वायन संस्थेचे व वामन उर्फ राजाभाऊ जोग यांचे लाभले आहे.
या नाटकात युवा गायिका सौ. करुणा पटवर्धन, गोव्याचा दत्तगुरु केळकर तसेच उमेश जोशी, चिन्मय दामले, अविनाश काळे, गणेश जोशी व शमिका जोशी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका करणार आहेत. साऊंड सिस्टीम व्यवस्था एस. कुमार साऊंड सर्विसचे उदयराज सावंत करणार आहेत. नाट्यव्यवस्थापन दत्ता केळकर करत असून या नाटकाच्या तिकीटांसाठी 9420051286 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नाटकाची तिकीटविक्री १७ एप्रिलपासून सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत चालू राहणार आहे.