(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाच्या उतारावर सोना ढाब्यासमोरील अपघाताचे सातत्य कायम असून याठिकाणी अचानक डावीकडील लेनवर भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरच्या चालकाचा ताबा वाहनावर न राहिल्याने टँकर थेट सोना ढाब्यामध्ये घुसला. यावेळी टँकर चालकाच्या छातीमध्ये ढाब्याच्या छप्पराचा ड्रायव्हर केबिनची काच फोडून आलेला लोखंडी पाईप घुसला. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर काही वेळातच या चालकाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली आहे.
पोलादपूर तालुक्यातील चोळई गावाच्या हद्दीतील चोळई गावठाण बाजूच्या सोना ढाबा हॉटेलसमोर महामार्गाची अचानक लेन बदलण्याच्या परिस्थितीमुळे अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. कशेडी घाटातील रस्त्याचा तीव्र उतार असल्याने या ठिकाणी वेगावर नियंत्रण ठेवताना वाहनावरदेखील नियंत्रण ठेवणे वाहनचालकांना कठीण होत असल्याने अपघाताचे सातत्य निर्माण झाले आहे.
आज (गुरूवारी) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटातून लक्ष्मीलाल भुरालाल मिनारीया (वय 54,रा. रूनदेड, उदयपूर, राजस्थान) हा टँकर (क्रमांक जीजे 18 एएम 3387) घेऊन भरधाव वेगाने घेऊन कशेडी घाटरस्ता उतरून पोलादपूरच्या दिशेला जात असताना डावी कडील लेनवर जाण्यासाठी स्टेअरिंग वळविल्यानंतर ते पुन्हा सरळ करता आले नाही. परिणामी, टँकर भरधाव वेगाने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या हॉटेल सोना ढाबाच्या इमारतीमध्ये घुसला. यावेळी ढाब्याच्या छप्पराचा लोखंडी पाईप ड्रायव्हर केबिनची काच फोडून आत आला आणि चालक लक्ष्मीलाल मिनारिया याच्या छातीमध्ये डाव्या बाजूला घुसला. अशा गंभीर जखमी अवस्थेत त्याने टँकरचे ब्रेक दाबून थांबविण्यात यश मिळविले.
यावेळी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेतून पोलादपूर पोलीसांनी चालकाला छातीत घुसलेला पाईप काढून ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केले. त्यावेळी तो उपचारास धीराने प्रतिसाद देत होता. उपचारादरम्यान पाईप काढल्यानंतर झालेल्या जखमेतून त्याचे हृदय स्पंदने घेताना दिसून येत होते. यावेळी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अचानक त्याचा मृत्यू ओढवला.
पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल जाधव, सहायक पोलीस उपनिरिक्षक जागडे, पोलीस हवालदार स्वप्नील कदम, पोलीस शिपाई कोळी आणि वाहतूक पोलीस धायगुडे यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने जखमीला रूग्णालयात दाखल करण्यासह अन्य पंचनामा व वाहतूक सुरळीत करण्याकामी तत्परता दाखविली.