(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणनगर येथील किर्तीनगर परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्डे चुकवत ये-जा करताना वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि रात्रीच्या अंधारात खड्ड्यांमुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. संबधित विभागाचे दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
विमानतळ रोडकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र किर्तीनगर येथील रस्त्यांवरील खड्डयांनी चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवत ये-जा करताना वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खड्डयातून प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. दिवसभर पाऊस बरसत आहे. येथील खड्ड्यांमध्येही पाणी साचून खड्ड्यांची खोली वाढली आहे. तसेच वाहनचालकांना रात्रीच्या वेळी पाणी साचलेल्या खड्ड्यातून अंदाज येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.