(दापोली)
तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जामगे परिसरात रस्ता सुमारे १५० मीटर रस्ता खचला आहे. त्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
मृद जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार आहे. तोपर्यंत रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रस्ता खचल्याची माहिती मिळतात तहसीलदार अर्चना घोलप, प्रांताधिकारी अजित थोरबोले तसेच जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्याने घटनास्थळाची पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठवला आहे.
दोन्ही बाजूने रस्ता बंद केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. एका बाजूला धरण आणि दुसऱ्या बाजूला डोंगर या परिसरातून जाणारा रस्ता आहे. डोंगर उतारातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे हा रस्ता खचल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. डोंगर उताराने येणारे पाणी जमिनीत झिरपून ते रस्त्याखालून येत असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी प्रशासनाकडे सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.