(मुंबई)
आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर ऋषभ पंत व शुभमन गिल या युवा फलंदाजांनी भारताचा डाव सावरला आहे. न्यूझीलंडच्या २३५ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४ फलंदाज गमावले होते. पण, ऋषभ व शुभमन ही जोडी मैदानावर उभी राहिली आहे. दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण करताना शतकी भागीदारीच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऋषभने अर्धशतकासह अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताच्या रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांनी त्यांना जाळ्यात अडकवले. आकाश दीपने चौथ्या षटकात डेव्हॉन कॉनवेला (४) माघारी पाठवले. त्यानंतर जड्डू (५-६५) व वॉशिने (४-८१) उर्वरित ९ फलंदाजांना गुंडाळले. किवींसाठी विल यंगने १३८ चेंडूंत ७१ धावा आणि डॅरिल मिचेलने १२९ चेंडूंत ८१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. २३५ धावांचा टप्पा टीम इंडिया सहज ओलांडेल असे वाटत होते. पण, रोहित शर्मा (१८), यशस्वी जैस्वाल (३०), मोहम्मद सिराज (०) व विराट कोहली (४) हे स्वस्तात माघारी परतले.
४ बाद ८४ वरून ऋषभ व शुभमन यांनी भारताचा डाव सावरला आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांकडून दोघांनाही जीवदान मिळाले. सोपे झेल टाकले गेले. ऋषभने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील वेगवान अर्धशतकाची नोंद केली. वानखेडे स्टेडियमवर १८ वर्षानंतर भारतीय यष्टिरक्षकाने कसोटीत अर्धशतक झळकावले. यापूर्वी २००६ मध्ये महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडविरुद्ध ६४ धावा केल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमधील ऋषभची ही १९ वी फिफ्टी प्लस धावांची खेळी आहे. भारतीय यष्टिरक्षकाकडून कसोटीत सर्वाधिक पन्नासहून अधिक धावांच्या खेळीत धोनी (३९) अव्वल स्थानावर आहे. ऋषभने आज दुसरे स्थान पटकावताना फारोख इंजिनियर (१८) यांना मागे टाकले. ऋषभ पंतने कसोटीतील आज ६६ वा षटकार खेचला. त्याने ३४८५ चेंडूंचा सामना करताना इतके षटकार खेचले. तेच एबी डिव्हिलियर्सने १६०३३ चेंडूंत कसोटी कारकीर्दित फक्त ६४ षटकार खेचले आहेत.