(लांजा)
आठवडाभरापासून सातत्याने बदलत असणाऱ्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, लांजा तालुक्यातील हाताशी आलेली भातशेती गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर नुकसानीचे मोठे संकट आले आहे.
एकीकडे भात, नाचणी, वरी पिकांवर क्न्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडली असतानाच आता पावसानेही नुकसान केले आहे. परतीच्या पावसाच्या सरी अजूनही सुरू असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरदिवशी वातावरणात बदल पहायला मिळत आहे. सध्या भातपिक कापणीला आली असून, लांजा तालुक्याच्या काही भागामध्ये भात कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे भातकापणीला व्यत्यय येतो आहे. पाऊस कधीही येत असल्याने भात कापणी रखडली आहे.
अचानक वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या या पावसामुळे भात, नाचणी पिकं जमिनीवर आडवी पडली आहेत. भातपिक बहरले असतानाच शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. भात पाण्यात कुजत असून, दाणे गळून पडू लागले आहेत. त्यामुळे हाताशी आलेले भात व नाचणा पीक गमावण्याचे संकट तालुक्यातील शेतकऱ्यांवर आले आहे.