(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शाळेत सर्व प्रथम पालक शिक्षक संघ रजिस्टर करणारे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, निवृत्त आदर्श मुख्याध्यापक, सडामिऱ्या बौद्धजन पंचायत समितीचे धडाडीचे माजी अध्यक्ष आयु. गोपिनाथ काशिनाथ जाधव (गुरुजी) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. ९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे राहत्या घरी निधन झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत पहिला पालक शिक्षक संघ रजिस्टर करण्याचे काम त्यांनी केले. एवढेच नव्हे तर या पालक संघाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्याने त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील चाफे नं.१ शाळेच्या दोन स्लॅबच्या वर्ग खोल्या उभ्या करून जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला. दिवंगत गोपिनाथ काशिनाथ जाधव हे जुन्या काळातील हाडाचे शिक्षक होते, कडक शिस्तीचे, स्पष्ट वक्ते, प्रामाणिक, मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते.
गोपीनाथ जाधव यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडात अनेक आदर्श विद्यार्थी घडवले. बौद्धाचार्य भूमिकेतून समाज प्रबोधनाचेही त्यांनी प्रशंसनीय आणि उल्लेखनीय कार्य केले. समाजातील गरजवंताला त्यांनी सढळहस्ते मदतीचा हात दिला.रत्नागिरी, गुहागर, राजापूर या तालुक्यात त्यांनी आपल्या कामाचा विशेष ठसा उमटविला होता. दिवंगत गोपीनाथ जाधव यांच्या पत्नी वैजयंती गोपिनाथ जाधव यांनीही शिक्षिका म्हणून आदर्शवत कामगिरी केली आहे. दिवंगत गोपीनाथ जाधव यांच्या निधनाबद्दल अनेक जाणकारांनी शोक व्यक्त केला. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सूना, नातवंडे, बहिण, पुतणे असा मोठा परिवार आहे.
गोपीनाथ जाधव यांच्यावर १० नोव्हेंबर रोजी सडामिऱ्या येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक संघटना, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कलाक्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर, समाजबांधव, नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचा जलदान विधी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी सडामिऱ्या येथील निवासस्थानी होणार आहे.शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार व्यक्तिमत्त्व हरपले असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.