(नवी दिल्ली)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमला मोठा दिलासा दिला आहे. आता पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंध 29 फेब्रुवारीपासून नव्हे तर त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी 15 मार्चनंतर लागू होणार आहे. याचा अर्थ पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि ग्राहकांच्या खात्यांमध्ये 15 मार्च 2024 पर्यंत व्यवहार करता येतील.
31 जानेवारी 2024 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमची बँकिंग सेवा बंद करण्याचा आदेश जारी केला होता. जे 29 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार होते. परंतु आता या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. आरबीआयने 31 जानेवारी रोजी सांगितले होते की, पेटीएम पेमेंट्स बँकेवर अनियमिततेबाबत कारवाई करण्यात आली आहे. ज्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातील व्यवहार, पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि टॉपअप यासारख्या सेवा 29 फेब्रुवारीनंतर बंद केल्या जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्या कारवाईच्या डेडलाइनला मुदतवाढ देण्यात आली आहे.
मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, त्यांनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर काही व्यावसायिक निर्बंध लादले आहेत. जे पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सद्वारे संचालित आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आरबीआयने पुढे सांगितले की, लोकांचे हित लक्षात घेऊन पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला आणखी काही वेळ दिला जात आहे.
15 मार्चनंतर या सेवा सुरूच राहणार
जर कोणी पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात परताव्याची वाट पाहत असेल, तर 15 मार्च 2024 नंतरही भागीदार बँकांकडून खात्यात परतावा, कॅशबॅक, स्वीप-इन किंवा व्याजाचा परतावा देण्यात येणार आहे. 15 मार्चनंतरही पेटीएमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. तर वॉलेटमध्ये जमा असलेली रक्कमही वापरता येणार आहे. आरबीआयने काढलेल्या आदेशात म्हटले की, जर तुमच्याकडे पेटीएम वॉलेट असेल तर त्यामधील रक्कम 15 मार्चपर्यंत वापरू शकता. मात्र, 15 मार्चनंतर ठेवींना जमा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. फक्त आधीच जमा असलेली रक्कम वापरल्या जाऊ शकणार आहे.
भारतीय फिनटेक कंपनी पेटीएमने 16 फेब्रुवारी रोजी आपले मुख्य खाते ( Nodal Account ) पेटीएम पेमेंट्स बँकेतून ( Paytm Payments Bank ) ॲक्सिस बँकेत (Axis Bank) हस्तांतरित केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 15 दिवसांच्या सवलतीनंतर, पेटीएमने कळवले की त्यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेतून ॲक्सिस बँकेत त्यांचे नोडल खाते हस्तांतरित केले आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची मूळ कंपनी One97 Communications ने आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेत एस्क्रो खात्याद्वारे ( escrow account ) हस्तांतरित केले आहे आणि तेथे खाते उघडले आहे. One97 Communications ने सांगितले की, Axis Bank मध्ये नोडल खाते हस्तांतरित केल्यानंतर, व्यापारी सेटलमेंट (merchant settlements) पूर्वीप्रमाणेच कोणत्याही व्यत्ययाशिवाय होत राहतील. बीएसईला सादर केलेल्या अहवालात कंपनीने म्हटले आहे की, पेटीएम क्यूआर (Paytm QR), साउंडबॉक्स (Soundbox), कार्ड मशीन पूर्वीप्रमाणे व्यापारी भागीदारांसाठी कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत राहतील.