(रत्नागिरी)
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १०) वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीने चिपळूण ते राजापूर अशी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली. ही यात्रा रत्नागिरीत दाखल होताच मारूती मंदिर येथे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. या वेळी यात्रेत सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षणविरोधी सरकारचा धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सकाळी ९ वाजता चिपळूण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बहादूरशेख नाका) येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर संगमेश्वरमार्गे देवरुखला ही यात्रा रवाना झाली. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन यात्रा पांगरीमार्गे रत्नागिरीला रवाना झाली. रत्नागिरी आगमन होताच वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष बेटकर मॅडम, तालुकाध्यक्ष राजन कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा संघटक सुनील कांबळे, जिल्हा महासचिव मुकुंद सावंत या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यात्रेचे स्वागत केले. मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन यात्रा राजापूरला रवाना झाली. तिथे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन लांजा तालुक्यात यात्रा रवाना झाली. तिथे कार्यर्कत्यांनी जोरदार स्वागत करून यात्रेचा समारोप करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष गौतम गमरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रवक्ते सुरसेन गमरे, चिपळूण तालुकाध्यक्ष महेश सकपाळ, तालुका उपाध्यक्ष बुद्धघोष गमरे, तालुका महासचिव विलास मोहिते, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजन मोहिते, भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका महासचिव संजय कदम, धामनवणेचे सरपंच सुनिल सावंत, डॉ. राजे, संजय गमरे, डॉ. मोहिते, कुणबी सेना जिल्हाध्यक्ष दीनानाथ रावरांग, कुणबी सेनेचे जिल्हा सचिव प्रदीप उदेग, कुणबी सेना तालुकाध्यक्ष संजय जाबरे, शशिकांत वाघे, भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे असित गमरे, प्रफुल्ल मोहिते, अजय पवार आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.
प्रकाश आंबेडकरांच्या सोबत आहोत
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमिवर वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, एससी, एसटी, ओबीसी, भटके विमुक्तांचे आरक्षण वाचविण्यासाठी लढा देत असून याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्यभर आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली. या यात्रेला जिल्हातून विविध समाज स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, तसेच आरक्षणवाद्यांसाठी लढत असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या सोबत आहोत असेही काही बांधवांनी उद्गार काढले आहेत.
यात्रेत रतन टाटांना आदरांजली अर्पण
उद्योगजगतातील महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्त्व असलेले रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे फक्त देशावर नाही तर संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनाने राज्यात एक दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला, मात्र आयोजित आरक्षण बचाव जनसंवाद यात्रे दरम्यान जिल्हाध्यक्ष गौतम गमरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आदरांजली अर्पण केली. तसेच रत्नागिरी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लावण्यात आलेला बॅनर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.