(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे येथे जिंदाल कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनल ची जागा स्थलांतरित करणे बाबत बुधवारी नांदिवडे येथील प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीकडून रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील निवेदनाची प्रत माहितीसाठी रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी तसेच जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की , नांदिवडे अंबूवाडी फाटा या ठिकाणी गॅस टर्मिनल उभारण्याचे काम काम जिंदाल उद्योग समूहाच्या माध्यमातून चालू आहे, अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी काम करीत असलेल्या ठेकेदार व कंपनीच्या कंपनीच्या वर्गाकडून मिळाली आहे. तसेच हा प्रकल्प उभा करीत असताना स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत कार्यालयाची देखील कोणतीही परवानगी घेतलेली नाही. या उलट 19 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत व दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत बहुमताने हा प्रकल्प नियोजित जागेवर होऊ नये, असा ठराव करण्यात आला आहे. त्या ठरावाची प्रत या अर्जासोबत जोडण्यात आलेली आहे.
वास्तविक पाहता जिंदाल उद्योग समूहाने 1993 साली स्टील कारखाना उभा करण्यासाठी स्थानिक शेतकरी वर्गाकडून जमिनी खरेदी केल्या. लोकांनी देखील या परिसराचा विकास होईल, भविष्यात आपल्या मुलांना रोजगार निर्मिती होईल, चांगल्या आरोग्य सेवा निर्माण होतील, पायाभूत सुविधा सुधारतील या भावनेने जागा दिल्या मात्र आज या संदर्भात स्थानिक लोकांची पूर्णपणे निराशा झालेली पाहायला मिळते.
सर्वप्रथम कंपनीने जिंदाल एनर्जी हा प्रकल्प चालू केला त्यातून निर्माण होणाऱ्या राखेमुळे आज संपूर्ण बागायती अडचणीत आहेत. जिंदाल पोर्ट चालू करून खोल समुद्रात जेटी बांधण्याचे काम केले त्यामुळे स्थानिक मच्छीमार अडचणीत आहे.तसेच कंपनीच्या बॉयलर मधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. इतकी भयावह परिस्थिती असताना देखील याआधी कधीच स्थानिक जनतेने अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतलेली नाही किंबहुना कायम सहकार्याची भावना ठेवली. मात्र आज या गोष्टी गांभीर्यपूर्वक आपल्या निदर्शनात आणून देण्याचे कारण इतकेच की, नुकतेच 12 डिसेंबर 2024 रोजी नांदिवडे प्रशाले शेजारी कंपनी परिसरात असणाऱ्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून वायुगळतीचा प्रकार प्रकार घडला याचा मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना त्रास झाला. अजूनही अनेक विद्यार्थी पूर्णत: बरे झालेले नाहीत. मात्र या संदर्भात कोणती ही ठोस भूमिका घेण्यात कंपनी प्रशासन चालढकल करत आहे.
अशातच कंपनी जे गॅस टर्मिनल उभे करण्याचे काम करीत आहे त्याच्या 200 मीटर इतक्या कमी अंतरावरती स्थानिक लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. याआधीच या ठिकाणी जिंदाल कंपनीच्या माध्यमातून साठा करीत असलेल्या राखेचा त्रास परिसरातील सर्वच नागरिकांना होत आहे .आज नांदिवडे गावातील अनेक विहिरींचे पाणी राखमय झाले आहे अनेक कॅन्सर पेशंट या परिसरात सापडत आहेत. याशिवाय या परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांना त्वचेच्या आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे. कंपनी प्रशासन जरी या प्रकल्पाची जबाबदारी घेऊ किंवा यामुळे कोणताही धोका होणार नाही असे सांगत असले तरी याआधी देखील विविध दुर्घटना कंपनी परिसरात झालेल्या आहेत. म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये कंपनी जे गॅस टर्मिनल उभे करत आहेत त्याबद्दल लोकांच्या मनात भीतीदायक वातावरण आहे.
विशेष बाब म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व किनारपट्टी नियमन झोन (सी आर झेड) कायद्यानुसार अशा प्रकल्पांसाठी सखोल अभ्यास, सार्वजनिक सुनावणी सार्वजनिक सुनावणी व स्थानिक नागरिकांच्या समंतीची आवश्यकता आहे.त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या प्रक्रियेत अपारदर्शकता राहिली असून स्थानिक लोकांच्या हरकतींचा विचार केला गेलेला नाही. त्या संदर्भात स्थानिक प्रशासन ग्रामपंचायती कार्यालय हे काम थांबवावे म्हणून कंपनी प्रशासना सोबत पत्र व्यवहार करीत आहे. मात्र कोणताही प्रतिसाद कंपनी प्रशासनाकडून मिळत नसल्याने या परिसरात राहणाऱ्या या सर्व नागरिकांनी एक बैठक घेऊन कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून राबबीत असलेल्या चुकीच्या धोरणांना संविधानिक पद्धतीने विरोध करण्यासाठी प्रदूषण विरोधी समिती स्थापन केली.
या समितीच्या माध्यमातून निवेदनात नमूद केलेल्या सर्व कारणांमुळे निवेदनानुसार विनंती करण्यात येते की, सदर गॅस टर्मिनारची जागा पर्यावरणपूरक आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी तसेच सदर प्रकल्पाबाबत संपूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया ठेवून स्थानिक नागरिकांच्या हरकती विचारात घेऊन घेऊनच पुढील कार्यवाही करावी .तसेच नाविन्यपूर्ण व्यवसाय, उद्योग आपल्या परिसरात आलेच पाहिजे त्या विरोधात येथील स्थानिक जनता कधीही जाणार नाही. त्यासाठी प्रशासनाच्या पाठीशी येथील स्थानिक ग्रामस्थ खंबीरपणे उभे राहू मात्र कंपनी प्रशासनाच्या नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी येथील शेती, बागायती, जैवविविधता किंबहुना आमच्या अस्तित्वावर घाला येत असेल तर ही जनता येत्या आठ दिवसात आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरायला कमी पडणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.
फोटो : उपविभागीय अधिकारी यांना गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतर विषयी निवेदन देताना प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडे चे सभासद