(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील प्रतिष्ठित आणि नामांकित व्यावसायिक, मालगुंड येथील नाॅवेल्टी स्टोअर्स आणि नाॅवेल्टी मेडीकल चे मालक श्रीकृष्ण वासुदेव काणे तथा नाना यांचे सोमवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना आदराने सर्व लोक “नाना” म्हणत असत.
नानांनी अत्यंत कठीण परिस्थितीत चिकाटीने व्यवसाय सुरू केला. घरची शेती, आंबा बागायती असून सुद्धा व्यवसायात त्यांनी झेप घेतली. ते फावल्या वेळात घरच्या शेतीत काम करत. तसेच संसारात हातभार लावत असत. तसे “काणे” हे मोठे एकत्रीत कुटुंब. आलेल्या लोकांची आदराने उठबस करणे हा या घराण्याचा स्थायी स्वभाव. ‘नाना ‘हे एकमार्गी, मितभाषी, शांत स्वभाव, कोणतीही नादुरुस्त वस्तू दुरुस्त करणे हा त्यांचा हातखंडा विषय. वागण्यात करारीपणा, शिस्त हा त्यांचा घेण्यासारखा गुणधर्म.
कोणतीही वस्तू कोठेही मिळत नसली तरी काण्यांचे दुकानात हमखास मिळणार असा त्यांनी स्वतःचा नावलौकिक मिळवला होता.सर्व सामान्य लोकांचा रत्नागिरीत संबंध नव्हता. त्याकाळी साधने नव्हती. त्यामुळे लोकांना येणारी अडचण ओळखून लागाणाऱ्या गोष्टी आपल्या दुकानात उपलब्ध करून दिल्या. स्टोच्या पिने पासून ते अगदी शाळेच्या पाठ्यपुस्तकापर्यंत नानांच्या दुकानात मिळत. अशाप्रकारे एकंदरीत ही त्यांची समाज सेवाच म्हणावी लागेल. या सर्व गोष्टीतून कायम आठवणीत राहतील असे “नाना” सर्वांमधून निघून गेल्याने संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मालगुंड येथील सध्याच्या नॉवेल्टी स्टोअर्स ॲन्ड नावेल्टी मेडिकल चे मालक किरण काणे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातू, नातसुन, पणतू , भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.