(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील शांतीनगर नाचणे येथील रत्नमाला चंद्रकांत चोरगे यांच्या तब्बल तेरा लाखांचे दागिने त्यांच्याच मुलाने व सुनेने परत देतो असे सांगून परत केले नाही. यावरून मुलाकडून फसवणूक झाल्याने चोरगे यांनी पोलीस ठाण्यात रीतस्तर तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या असता तेथील पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास उडवा-उडविची उत्तरे देऊन तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत रत्नमाला चंद्रकांत चोरगे यांनी स्वतंत्र दिनी (दिनांक 15 ऑगस्ट 2024) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसल्या आहेत.
पोलीस ठाणे ही न्यायाची पहिली पायरी आहे. सामान्य नागरिक आपल्याला पोलिसांकडून न्याय मिळेल या भावनेने पोलीस प्रशासनाकडे येत असतात. लोकांच्या तक्रारी दाखल करून घेणे पोलिसांना बंधनकारक असते . तसेच तक्रारदाराला समाधानकारक उत्तरं मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु अनेकदा न्यायाची पहिल्या पायरीवर अन्याय होत आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण रत्नमाला चंद्रकांत चोरगे यांचे आहे. चोरग यांनी उपोषणाला बसण्याबाबतचे निवेदन दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक, शहर पोलीस ठाणे यांना दिले होते. परंतु संबधित प्रशासनाकडून न्यायिक भूमिका घेतली गेली नसल्याने अखेर 15 ऑगस्ट रोजी आपल्या मुलीसह रत्नमाला चोरगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडले.
प्रशासनाला दिलेल्या निवेनात म्हटले आहे की, मी 2015 साली शहर पोलिस ठाण्यात मला माझ्या मुलग्याने व सुनेने 18.500 ग्रॅ. सोन्याचे दागिने 13,00,300 (तेरा लाख तीनशे रूपये) माझ्याकडून घेऊन मला परत देतो सांगून परत केले नाही. व माझी फसगत केली असता मी रीतसर तक्रार दिली होती. त्यानंतर 2015 साली महिला अतिदक्षता मध्येही तक्रार दिली होती व दि 13/08/2024 रोजी ही मी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याकरीता गेले होते. पण तिथे ही पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कोणीही आम्हा गरीबांना सहकार्य करताना दिसत नाही.
तुमच्या शिवाय दुसरा कोण वाली नाही….
आज माझी आर्थिक परिस्थिती खूप गंभीर आहे. 16 महिन्यापासून घरभाडे थकित आहे. औषधाला सुध्दा पैसे नाही. घरामध्ये जेवणाला सुध्दा पैसे नसतात. आम्ही खूप संकटात आहोत. आम्हा गरिबांना तुमच्या शिवाय दुसरा कोण वाली नाही. तरी माझं एवढच म्हणण आहे कि, माझ्या सुनेला (अस्मिता वैश्व चोरगे) व मुलगा वैभव चंद्रकांत चोरगे याला शहर पोलिस ठाणे रत्नागिरी येथे हजर करून सामंजस्याने माझ्या तक्रारीचे निवारण करून द्यावे, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का?
या प्रकरणाबाबत संवाद सोशल फाउंडेशन अध्यक्षा फैमिदा काझी यांनी पुढाकार घेऊन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना दिनांक 13-08-2024 रोजी निवेदन दिले होते. दोन्ही पक्षांना शहर पोलिस ठाण्यात बोलावून हा विषय सामंजस्याने सोडवून अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी फाउंडेशनच्या वतीने काझी यांनी केली होती. परंतु पोलिसांनी या पत्राला ही केराची टोपली दाखवली आहे. या प्रकरणाबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यास पोलिसांवर जिल्हा पोलिस अधीक्षक कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच अन्यायग्रस्त रत्नमाला चोरगे ह्या पोलिस प्रशासनाकडून योग्य न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहेत.