(रत्नागिरी)
जिल्हा पोलिस दलातील १४९ पोलिस शिपाई आणि २१ चालकांची रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया १९ आणि २० जून रोजी रत्नागिरीत होणार आहे. यासाठी ८,७१३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी ऑनलाइन उपस्थित होते. तर अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके (मुख्यालय) उपस्थित होत्या.
यावेळी भरती संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. पावसामुळे या कालावधीत मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर, उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx याद्वारे सूचना मिळाली असल्यास अशा उमेदवारांना रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून या दोन चाचण्यांदरम्यान चार दिवसांचे अंतर राखून दुसरी तारीख दिली जाणार आहे. उमेदवारांना काही अडचण असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा, तसेच इतर अडचणी असल्यास त्यांचे निरसन पोलिस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांचे मार्फत केले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर, शनिवार व रविवार हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत. पोलिस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप, १०० मीटर धावणे व गोळाफेक पोलिस मुख्यालय येथील कवायत मैदान येथे होणार आहे. तर १६०० व ८०० मीटर एमआयडीसी रत्नागिरी येथील मैदानावर घेण्यात येणार आहे, असे पोलिस प्रशासनाने सूचित केले आहे.
कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास नंबर संपर्क साधावा…
भरती प्रक्रिया अथवा लाचेची मागणी अशा कोणत्याही अडचणीसाठी रत्नागिरी पोलिस नियंत्रण कक्षातील व्हॉट्सॲप क्रमांक : ८८८८९०५०२२, पोलिस अधीक्षक कार्यालय २७१२५७ व ईमेल sp.ratnagiri@ mahapolice.gov.in, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई यांचे कार्यालय २७५६३२५७, ईमेल – ig.kokanrange@mahapolice.gov.in यावर संपर्क करावा.