(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यांतील मालगुंड भाटलेवाडी येथे श्री महालक्ष्मी मंदिराचा गुरूवार दि.26 डिसेंबर रोजी रौप्य महोत्सव संपन्न होणार आहे. या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब मालगुंड भाटलेवाडी यांच्यावतीने भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंचक्रोशीतील व आमंत्रित संघांनी सहभाग घेतला.
यावेळी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑल मिरकरवाडा रत्नागिरी व गोपाळकृष्ण मालगुंड संघांनी मजल मारली. यामध्ये ऑल मिरकरवाडा रत्नागिरी संघ विजेता तर गोपाळकृष्ण मालगुंड संघ उपविजेता ठरला. यानंतर या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आणि संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभात सन्मानित करण्यात आले.
यावेळी विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रकमेची बक्षीसे आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब भाटलेवाडी मालगुंड येथील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.