(रत्नागिरी)
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासात एसटीच्या बसेसवरील सरकारी जाहिराती न हटवल्याचा निष्काळजीपणा सहायक वाहतूक अधीक्षक यांना बसला आहे. या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सहायक वाहतूक अधीक्षक यांना निलंबित केले आहे. या बाबतची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आचारसंहितेच्या नियमाची अंमलबजावणी रत्नागिरी एस. टी. आगाराकडून न झाल्याने सहायक अधीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एस.टी. बसेसवर जाहिरात करणारी पोस्टर्स निवडणूक काळात काढण्याच्या सूचना निवडणूक विभागाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, रत्नागिरी एस. टी. आगाराकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संबंधित सहायक अधीक्षकांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी कडक कारवाईचे संकेत आपण यापूर्वी दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ५४ बैठका आपण घेतल्या आहेत. सर्व विभागांना वारंवार सूचना केल्या जातात जर त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसेल तर कारवाई करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर एस.टी.च्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.