(रत्नागिरी / प्रतिनिधी)
विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत झालेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला तडाखा बसला आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पोर्चला सुशोभिकरणासाठी पीओपीचे डिझायनिंग करण्याचे काम सुरु होते. पावसाने व वार्याने पीओपी शीट्स धडाधड खाली पडल्या व आतील पातळ शीट लोंबकळू लागली.
दरम्यान येत्या काही दिवसात राज्य सरकारच्या निधीमधून होत असलेल्या सुशोभीकरणाचा उद्घाटन सोहळा होणार होता. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरणाचे काम राज्य शासनाच्या निधीमधून सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून हे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने त्याआधी रेल्वे स्थानकावरील या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळाहोण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान घडलेल्या प्रकराबाबत वीज पडल्याने हे झाल्याची काहींनी शक्यता व्यक्त केली होती. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर वीज पडली हि अफवा संपूर्ण रत्नागिरीभर पसरली. परंतु वीज पडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारतीवर वीज पडते तेव्हा तडे जातात, जळल्याच्या खुणा राहतात तर काही ठिकाणी भगदाडे पडतात. तसे काहीही झालेले नाही. तसेच रेल्वे स्टेशन इमारतीवर ‘लायटींग अॅरेस्टर’ असल्याने इमारतीवर वीज पडून नुकसान होण्याची शक्यता नसल्याचे रेल्वेच्या जाणकारांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी उशिराने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजंच्या जोरदार कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे बेसावध असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. उद्घाटनाच्या आधीच सुशोभीकरण कामाची अशी स्थिती झाल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे प्रवाशांनी कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली. वादळ सुरू असताना नव्याने बसवण्यात आलेल्या पीओपीच्या शीट्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उडतानाचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले आहेत.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरण कामाची जणू लक्तरे निघाली. मात्र छतातून थोडीफार जरी गळती असेल तरी पीओपी सुटून खाली पडते. अचानक आलेल्या पावसात कुठेतरी पाणी लागल्याने पीओपी गळून पडल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याचाच अर्थ सुशोभिकरणाच्या कामाची क्वालिटी कशाप्रकारची आहे हे स्पष्ट होते असे मत याबाबत बोलताना अनेक नागरिकांनी सडतोडपणे व्यक्त केले. हे कामाचा दर्जा खराब असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान मागील काही महिन्यांपासून कोंकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांची सुशोभीकरणाचे काम सुरु आहेत. फक्त मुख्य प्रवेशद्वार याचे सुशोभीकरण मग फ़्लॅटफॉर्म व इतर सुविधांकडे का दुर्लक्ष असा सवाल प्रवाश्याचा आहे.