(रत्नागिरी)
आठ वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याच्या घटनेमुळे पोलिसांनी रात्रभर जागून तिचा शोध घेतला. केवळ एका नातेवाईकाने माहिती न दिल्यामुळे अख्ख्या पोलीस स्थानकाला चिमुलकीच्या शोधासाठी रात्रभर सर्चमोहीम राबवावी लागली. अखेर चिमुलकीचा शोध लागताच पोलिसांनी निःश्वास टाकला.
शनिवारी दुपारी 12.30 ते 3 या कालावधीत कुवारबाव येथील राहत्या घरातून आपल्या आठ वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची तक्रार वडिलांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दाखल केली. आपण आपल्या मुलीला सर्वत्र शोधले. परंतु तिचा कुठेच पत्ता लागत नाही. तुम्हीच तिला शोधा असे वडिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही परिसरासह नातेवाईकांकडे चिमुकलीचा शोध घेतला. परंतु सर्वच नातेवाईकांनी चिमुकली आपल्याकडे आली नसल्याचे सांगितले, तोपर्यंत रात्र झाली होती.
आठ वर्षीय चिमुकली भरदुपारी गायब झाल्याच्या घटनेची दखल प्रभारी पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी घेतली. त्यांनी पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह पोलीस स्थानकातील सर्वांनाच चिमुकलीला शोधण्याचे आदेश दिले. कोकण परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांनीही या घटनेची गांभिर्याने दखल घेत जिल्ह्यात सर्व पोलीस स्थानकांना चिमुकलीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील, अंमलदार श्री.सावंत, श्रीमती चांदिवडे, श्रीमती पवार यांच्या पथकाने रात्रभर चिमुकलीचा शोध घेतला. परंतु चिमुकली कोठेच सापडली नाही. अखेर पथकातील श्री.सावंत यांनी चिमुकलीच्या आत्येच्या नाणिज येथील गावात चौकशी केल्यानंतर त्यांना चिमुकली आत्येकडे असल्याची माहिती मिळाली. परंतु यापूर्वी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आत्येने चिमुकली आपल्याकडे नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे मध्यरात्रीच पोलीस पथक नाणिज येथे दाखल झाले. येथे चौकशी केल्यानंतर चिमुकली आत्येकडे सुखरूप असल्याचे पोलिसांना समजले.
चिमुकलीच्या आई-वडिलांचा कौटुंबिक वाद असल्याने चिमुकली व वडील दोघेच एकत्र राहतात. वडिलांना मद्यपानाचे व्यसन असल्याने ते चिमुकलीला ओरडतात. यातूनच आत्येने शनिवारी दुपारी चिमुकलीला आपल्या घरी नेेले होते. पोलीस वडिलांना याची माहिती सांगतील म्हणून आत्येने पोलिसांनाही खोटी माहिती दिली. तर वडिलांच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्थानकात चिमुकलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या सगळ्या प्रकारामुळे रात्रभर पोलिसांना मात्र त्रास सहन करावा लागला.