(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील वाटद एमआयडीसीच्या भूसंपादनाला येथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. भूमी अभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उप विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही संयुक्त मोजणी करण्यात येत होती. मात्र टोकाच्या विरोधामुळे नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनीची मोजणी करता आली नाही. परंतु या परिसरातील एका खासगी कंपनीच्या पंधरा एकर जमिनीची मोजणी करून अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागेल.
तालुक्यातील वाटद एमआयडीसीसाठी लागणार्या भूसंपादनाच्या मोजणीला कळझोंडी ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. मोजणीसाठी आवश्यक असलेले कोणतेही सहकार्य आम्ही करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे मोजणीसंदर्भातील नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनीची मोजणी करता आली नाही. परिसरातील एका खासगी मालकीच्या १५ एकर जमिनीची मोजणी करून भूमी अभिलेखचे पथक माघारी गेले. भूमीअभिलेख विभागाकडून कळझोंडीतील जमीनमालक, शेतकरी व इतर जागा मालकांना वेळेत नोटीस मिळालेल्या नाहीत. तर अनेक ग्रामस्थांना मोजणी संदर्भातील नोटीसा देखील मिळाल्या नाहीत. त्याचबरोबर ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच व प्रतिनिधी यांना विश्वासात न घेता किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता जमीन मोजणीसाठी पथक दाखल झाल्याने परिसरातून ग्रामस्थ देखील घटनास्थळी दाखल झाले.
ग्रामस्थ एकवटत असल्याचे समजताच पोलिस बंदोबस्त सुद्धा मागविण्यात आला होता. परंतू ग्रामस्थ आक्रमक असल्याने एका खासगी जमिनीची मोजणी करून भूमिअभिलेखचे विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांना कळझोंडी गावातून माघारी परतावे लागले. ग्रामस्थांनी यापूर्वी देखील एमआयडीसीला आणि भू संपादनाला विरोध दर्शवला आहे.
पथकातील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन
यावेळी ग्रामस्थांनी प्रांत विभागाकडून काढलेल्या नोटीसीबाबत अधिकाऱ्यांना सडेतोड पद्धतीने जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांतर्फे उमेश संभाजी रहाटे, दीपक लक्षमण चौगुले, श्री. सहदेव, महेश जोगळे, शांताराम कीर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने पथकातील अधिकाऱ्यांना जमीन मोजणीला विरोध असल्याचे निवेदनही सादर केले.