(रत्नागिरी)
शहरातील उद्यमनगर-पडवेकर कॉलनी येथील घरफोडीचा छडा लागला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी अट्टल गुन्हेगाराला अटक केली, त्याच्याकडून १ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लियाकत अब्दुल्ला नावडे (वय ४५ वर्षे, रा. कोकण नगर बगदादी चौक, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, १९ फेब्रुवारीला पडवेकर कॉलनी येथे राहणारे एक कुटुंब बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने त्यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणो शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक जनार्दन परबकर यांनी या गुन्ह्यासाठी तत्काळ एक पथक तयार केले आणि गुन्हा उघडकीस आणण्याच्यादृष्टीने सूचना केल्या.
पथकाकडून चोरट्याचा शोध सुरू असताना रेकॉर्डवरील अट्टल संशयित लियाकत अब्दुल्ला नावडे याने ही चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली, या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लियाकत नावडे याला काल ताब्यात घेतले, चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने व गुन्ह्यात वापरलेलो रिक्षा असा एकूण १ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पथकाला यश आले.
लियाकत नावडे हा अट्टल गुन्हेगार, ११ गुन्हे दाखल
लियाकत अब्दुल्ला नावडे हा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडीचे विविध ११ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे, हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, सागर साळवी, वैष्णवी यादव, दत्ता कांबळे यांच्या पथकाने केली.