(रत्नागिरी)
शहरातील मारुती मंदिर परिसरातील ओमकार डेव्हलपर्स व स्टार इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय फोडून ऐवज चोरीला गेला होता. या चोरीप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी स्वप्निल राजाराम मयेकर (वय ३८, मूळ रा. सेक्टर १९, खारघर जि.रायगड, सध्या रा. छाया गेस्ट हाऊस, रत्नागिरी) याला रविवारी अटक केली.
मारुती मंदिर येथील दोन अपार्टमेंटमध्ये १४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान या चोऱ्या झाल्या होत्या. या घरफोड्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तत्काळ नियुक्त करून गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.
घटनास्थळावरील, तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूस असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे या चोऱ्या मुंबई येथील रेकॉर्डवरील आरोपी स्वप्निल मयेकर याने केल्याचे तपासांत पुढे आले होते. त्यानंतर पथकाने ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रत्नागिरी, आदी ठिकाणी त्याचा शोध घेतला. त्यानंतर रविवारी त्याला रत्नागिरीतील एका लॉजवर अटक केली. त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली असून, गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. अटकेनंतर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकातील दोन आणि एल. टी. मार्ग मुंबई, पनवेलमध्ये दाखल गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दीपराज पाटील, शांताराम झोरे, विवेक रसाळ, रमिज शेख, पोलिस कॉन्स्टेबल अत्ल कांबळे यांनी केली.
आरोपीवर मुंबईसह गुजरात, गोव्याच्या ठिकाणी गुन्हे
आरोपी स्वप्निल मयेकर हा मुंबई व ठाणे येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आदी ठिकाणी चोरी, घरफोडीचे सुमारे २० गुन्हे दाखल आहेत. तसेच गुजरात व गोवा या राज्यांमध्येही त्याने गुन्हे केले आहेत.