(नवी दिल्ली)
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागेल. अशा परिस्थितीत उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निवडणूक आयोग काटेकोर लक्ष ठेवणार आहे. यासाठीच निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचे दर निश्चित करण्यात आले आहेत. निवडणुक म्हटली, की कार्यकर्ते सांभाळणे आलेच. त्यांच्या चहापानासह अगदी निवासाची व्यवस्था करणे हीदेखील त्याची जबाबदारीच; परंतु उमेदवाराकडून पार पाडली जाणारी प्रत्येक जबाबदारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पैशांमध्ये मोजली जाणार आहे.
निवडणूक काळात सतरंजी उचलणाऱ्यासह अगदी सर्व प्रकारची फिल्डिंग लावणारा प्रत्येक कार्यकर्ता तेवढाच महत्त्वाचा. उमेदवाराच्या जय-पराजयात कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते उमेदवारासाठी राबतात. अशा कार्यकर्त्यांसह त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला हातही सैल सोडावे लागतात.
नियमांचे पालन करत निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यादृष्टीने निवडणूक आयोग अत्यंत बारकाईने सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. विविध पक्षांकडून आता उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यानंतर उमेदवारांचा प्रचार सुरू होईल. यासाठी रॅली, सभामंडप, लाऊडस्पीकर यासह ढोल-ताशांचा वापर केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रत्येक वस्तूची किंमत निश्चित केली आहे. उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांना चहा दिल्यास प्रति चहा 20 रुपये आणि कॉफीसाठी 25 रुपये निवडणूक खर्चात जोडले जातील. तुम्ही नाश्त्यासाठी 30 रुपये आणि वडापावसाठी प्रति व्यक्ती 25 रुपये खर्च करू शकता.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचाररथांचा वापर करतात. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने रथाचे भाडे दोन तासांसाठी 15,550 रुपये आणि तीन तासांसाठी 22 हजार रुपये असे निश्चित केले आहे. उमेदवाराने ढोल-ताशे वापरल्यास निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसार तो खर्च ग्राह्य धरला जाईल. महानगरात दोन तासांसाठी 10 ढोल आणि एक ताशा (लहान युनिट) या जोडीचे भाडे 18,500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. दोन तासांसाठी 25 ढोल-ताशासाठी 32 हजार रुपये आणि 50 ढोल-ताशासाठी 55 हजार रुपये ग्राह्य धरला जाईल.
निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या किमतीनुसार आपला खर्च डायरीत लिहावा लागेल. यावेळी निवडणूक प्रचार आणि रॅलींमध्ये वापरल्या जाणाऱ्या झेंड्याची किंमत आकाराच्या आधारे ठरवण्यात आली आहे.
प्रचार साहित्य – खर्च (रुपये)
रथाचे भाडे (दोन तास) – १५,५५०
रथाचे भाडे (तीन तास) – २२,०००
कापडी ध्वज – ७
रेशमी ध्वज – ४०
जम्बो ध्वज – ७०
टोपी – १०
कॉटन मफलर – १०
सिल्क मफलर – १५
उमेदवारांच्या बैठकी, कोपरा सभा, रॅली अशा प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचे व्हिडीओ सर्व्हेलन्स पथक खर्चावर लक्ष ठेवणार आहे. याखेरीज व्हिडीओ व्हीविंग पथक (व्हीव्हीटी), खर्च निरीक्षक हेदेखील उमेदवाराने सादर केलेला खर्च आणि पथकाने नोंदविलेला खर्च याची पडताळणी करणार आहे. उमेदवाराच्या खर्चात हा खर्च मोजला जाणार आहे.