(देवरूख)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयामधील एम.एम.एस विभागाचा “एक्सप्लोअर – २ के २४” हा वार्षिक युथ फेस्टिवल दिमाखात संपन्न झाला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पदवी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जनरल चॅम्पियनशिप मुख्य आकर्षण असलेल्या या एक दिवसीय युथ फेस्टिवलमध्ये क्लॅश ऑफ ब्रेन, बिझिनेस प्लान, अॅडमॅड जुनून, रंगोली, फोटोग्राफी,पोस्टर मेकिंग यासारख्या विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. दोन्ही जिल्ह्यातील जवळपास नऊ महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक श्री. रविंद्रजी माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, आठल्ये सप्रे महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. सरदार पाटील, एम एम एस विभागप्रमुख प्रा. मासुमा पागारकर, तसेच विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
सुरुवातीला दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर एक्सप्लोअरच्या संयोजक प्रा. मासुमा पागारकर यांनी प्रास्ताविक करताना फेस्टिवल आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.
याप्रसंगी महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना परिसरातील पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत व त्यांचा सर्वंकष विकास व्हावा यासाठी माने महाविद्यालयाने या कार्यक्रमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने यानी आपल्या भाषणात उद्योग धंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकीय ज्ञान उपयुक्त असल्याचे सांगून इच्छाशक्ती, आत्मविश्वास, मेहनतीपणा यासारख्या गुणांकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे सांगितले.
यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या. प्रामुख्याने आठल्ये सप्रे महाविद्यालय देवरुख, डी.बी.जे महाविद्यालय चिपळूण, गुरुकुल कॉलेज चिपळूण, डी. जे. सामंत पाली, मामासाहेब भुवड कॉलेज देवरुख, डीकॅड कॉलेज, महर्षी कर्वे कॉलेज रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा सांगता समारंभ प्रमुख पाहुणे रत्नागिरी येथील प्रतिथयश उद्योजक श्री. गौरांग आगाशे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्पर्धकांना संबोधित करताना त्यानी अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाची गरज असून त्यासाठी असे स्पर्धात्मक उपक्रम उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पदवीनंतर एम एम एस सारख्या अभ्यासक्रमांची निवड योग्य ठरेल असे ते म्हणाले.
यावेळी सहभागी स्पर्धकांनीही या फेस्टिवलमधील सहभाग व महाविद्यालय परिसरातील हा एक सुंदर अनुभव होता असे सांगितले. प्रमुख अतिथी गौरांग आगाशे, रवींद्र माने, प्राचार्य डॉ महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. मासुमा पागारकर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना विद्यार्थ्यांना चषक, प्रमाणपत्रे, रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विजेतेपदे मिळवत “एक्सप्लोअर २k२४” जनरल चॅम्पियनशिप पटकाविली.मिस एक्सप्लोअर २k२४ हा किताब आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या श्रावणी नार्वेकर हिने तर मिस्टर एक्सप्लोअर २k२४ हा किताब गुरुकुल महाविद्यालयाच्या धनेश भागवत याने पटकावला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी तन्वी ठसाळे, यश लिमये आणि कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.