(संगमेश्वर)
तालुक्यातील प्र. शि. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलन “आरोहण २के२४” चे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन झाले. आंतरमहाविद्यालयीन कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा यामध्ये समावेश असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उद्घाटन समारंभाला देवरुख नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री. चेतन विसपुते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. समारंभाला दिपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुणे व अन्य मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आंबव ग्रामदेवता कालीश्रीच्या मंदिरामध्ये क्रीडाज्योत प्रज्वलित करून मैदानात मिरवणुकीने आणण्यात आली. रवींद्र माने यांच्या हस्ते या क्रीडाज्योतीची मैदानामध्ये स्थापना करण्यात आली. श्री. चेतन विसपुते यांच्या हस्ते यावेळी श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख व्यासपीठावर स्थानापन्न होते.
यानंतर महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांच्या तुकड्यांनी दिमाखदार ध्वजसंचालन करून मान्यवरांना सलामी दिली. उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना दाद लाभली. परेड तुकड्यांच्या सर्व प्रमुखांनी नंतर आपापल्या विभागाच्या ध्वजाची मैदानात स्थापना केल्यानंतर विद्यार्थी क्रीडाप्रमुख चिन्मय परब याने सर्व खेळाडूना संपूर्ण स्पर्धांमध्ये खिलाडूवृत्ती व शिस्त जोपासण्याची शपथ दिली.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले कि, स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपले कला व क्रीडा नैपुण्य सादर करण्याची संधी असते. त्यासाठी विविध प्रकारांमध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवून निर्णयक्षमता व आत्मविश्वास वाढविण्यासाठी या स्नेह्समेलनाचा उपयोग करून घेण्याचे आवाहन करून त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री. चेतन विसपुते यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, करिअर घडविण्यासाठी कला व क्रीडा प्रकारांचा महत्वाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीने या स्पर्धांमधून सहभाग घ्यावा व कठोर परिश्रमाने यशस्वी व्हावे. राजेंद्र माने महाविदयालयाचे विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये नेहमीच चमकत असल्याचे सांगून त्यांनी विशेष कौतुक केले व पुढील स्पर्धांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा या स्तुत्य व प्रशंसनीय वातावरणात खेळण्याचा सल्ला दिला. शारीरिक फिटनेस, खेळाचे ज्ञान व तयारी हि यशाची गुरुकिल्ली असून त्यावर खेळाचा निकाल अवलंबून असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या ध्वजसंचालनाचा निकाल जाहीर केला आणि स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाल्याची अधिकृत घोषणा केली. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागाला मार्च पासमध्ये प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला. प्रा. समीर यादव यांनी मार्च पासचे परीक्षण केले. आरोहण अंतर्गत पुढील आठवडाभर विविध स्पर्धा पार पडणार असून दि. २५ फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व हरीयान व भक्ती सावंत यांनी केले. क्रीडा स्पर्धा समन्वयक म्हणून प्रा. सुनिल अडूरे तर सांस्कृतिक स्पर्धा समन्वयक म्हणून प्रा. गणेश जागुष्टे काम पहात आहेत. विविध स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी अमेय माने, शुभम भडकमकर, विद्यार्थी क्रीडा प्रमुख राहुल परब व शाहबाज काझी, सांस्कृतिक विभागप्रमुख सात्विक बेर्डे व इतर विद्यार्थी सदस्य मेहनत घेत आहेत. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचार्यांचे यासाठी सहकार्य लाभत आहे.