(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल दिवाळवाडी येथील राजाराम गंगाराम सुतार यांचा 20 वर्ष जुना असलेल्या वाड्यावर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीची लघुदाब कंडक्टर वायर तुटून पडल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आज दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत वाड्यात असलेल्या दोन जनावरांना ग्रामस्थांच्या मदतीने वाड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी जनावरांचा चारा आगीत जळून खाक झाला आहे.
सदरच्या घटनेची कल्पना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे पाचल शाखा कानिष्ठ अभियंता संदीप बनगर यांना मिळताच त्यांनी प्रिन्सिपल टेक्निशियन दिलीप सुर्वे यांनी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने तुटलेली वायर तात्काळ जोडण्याचे काम केले. या आगीत वाड्याची लाकडं, गवतच्या शंभर वरंडी, गवताची उटी, आंब्याचे, फणसाचे व सिताफळाचे झाडं आगीत जळून खाक होऊन जवळपास एक लाखाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. सदरचा तपास पाचल तलाठी संचित पाटील यांनी केला असून तो वरिष्ठाना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.