(मुंबई)
कोकणातील राजापूर विधानसभेचे ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी ‘शिवबंधन’ तोडत अखेर ‘धनुष्यबाण’ हातात घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंद मठाजवळ शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचे उपरण घालत त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी राजन साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या वर्षी झालेल्या विधानभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ते नाराज होते. साळवी यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवधनुष्य हाती घेतलं. उद्योगमंत्री उदय सामंत देखील यावेळी उपस्थित होते.
माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किरण सामंत आणि राजन साळवी उपस्थित होते. यावेळी राजन साळवी यांनी “एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त आलं, आणि मी या ठिकाणी येत शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? याचे कारणही सांगितले होते. ते म्हणाले की, “मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते. त्यानंतर वाटलं आता थांबाव, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे असं आग्रह या मंडळींनी धरला. विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ” असे त्यांनी सांगितले होते.
राज्यात 2014 साली परिवर्तन झालं. त्यावेळी मंत्री होईल असं वाटलं होतं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे शिफारस केली होती. पण, ऐनवेळी विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांची शिफारस केली. विनायक राऊत यांच्यामुळे माझं मंत्रिपद हुकलं असा आरोप साळवी यांनी केला. 2019 मध्येही वाटलं होतं संधी मिळेल पण उदय सामंत शिवसेनेत आले आणि मंत्री झाले. 2024 मधील पराभव मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जिव्हारी लागला. आम्ही विनायक राऊत यांना मोठं केलं. त्यांना खासदार केलं पण, तेच राऊत पराभवाला जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला.
बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजत असे. त्यानंतर सहकाऱ्यांना नोकर, घरगडी अशी वागणूक देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षांपूर्वी राज्यात उठाव करावा लागला. संघर्ष करावा लागला, लोकांच्या मनातील सरकार स्थापन करावं लागलं.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहात, याचा आनंद आहे. या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल… ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागेल तिथं कसा राहिल राजन साळवी? असाही टोला त्यांनी लगावला. मी मुख्यमंत्री होतो तेव्हापासून माझ्या मनात होते राजन साळवी आले पाहिजेत. त्यावेळी योग नव्हता. काही लोकं त्यांना आडवे आले होते. आता त्यांनी त्यांना दूर केलं आहे. सर्व स्पीडब्रेकर दूर केले आहेत. काम करण्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. फेसबुक लाईव्हनं काम होत नाही. मी सर्व मंत्र्यांना लोकांमध्ये जाण्याची सूचना दिली आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.