( रत्नागिरी /प्रतिनिधी )
परतीच्या जोरदार पावसामुळे रत्नागिरी ते हातखंबा मार्गाची पुन्हा एकदा दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचत असून याकडे संबधित महामार्ग प्राधीकरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आरआयपीएल या ठेकेदार कंपनीचे चांगलेच फावत आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणी करून संबंधीत विभागाला महत्वाच्या सूचना केल्या होत्या. परंतु दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे बाजूलाच राहिले, हा महामार्गच धोकादायक प्रवासाचा बनला आहे.
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या पावसाचा दणका मिऱ्या-नागपूर महामार्गाला बसला आहे. ठेकेदार कंपनीने कुवारबाव परिसरातील डी-मार्ट समोरील रस्त्यासह अन्य भागातील रस्ते पहिले खोदून ठेवल्याने एकाच बाजूच्या अरुंद रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. अशा कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. येथील रस्तावरील असणारा डांबरीकरणाचा थर जेसीबीच्या साहाय्याने उखडून काढल्याने मातीचा रस्ता तयार झाला. सद्या याच मातीच्या रस्त्यावर चिखल तुडवत वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. अगदी तशीच स्थिती हातखंबा ते चांदसूर्या भागात पाहायला मिळत आहे. या रस्त्यावरून दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये- जा करण्यासाठी जागाच नसल्याचे चित्र आहे. या रस्त्यासंदर्भात अनेक समस्या निर्माण होत आहे. मात्र तरी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
एका बाजूने काम तर दुसऱ्या बाजूने त्रास….
चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार आरआयपीएल कंपनीने मिऱ्या ते साखरपा या भागातील तुकड्यात एका मार्गीकेचे काँक्रीटीकरण केले आहे. तर उर्वरित भागात संथ गतीने काम सुरू आहे. मात्र अशातच लोकांना ज्या भागात त्रास सहन करावा लागत आहे. तेथील मार्गिकेचे अर्धवट काम सोडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात तर तुकड्यात दोन्ही मार्गिकांचे काँक्रिटीकरण केले आहे. मात्र एका बाजूने काम सुरू असताना दुसऱ्या बाजूने वाहनचालकांचा त्रास कमी होणे अपेक्षित आहे. परंतु या उलट होत असून रस्त्यांचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अधिक होत आहे. आधीच खड्ड्यांना कंटाळलेल्या वाहनचालकांना आता चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे. अशी गंभीर स्थिती निर्माण झाली असून ऐन निवडणुकीच्या कालावधीत स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.